signalसध्या राज्यभरातील टोलनाक्यांचा प्रश्न गाजत आहे. नियमांनुसार काही ठरावीक किलोमीटरच्या अंतरात एकापेक्षा अधिक टोलनाके नसावेत. पण ठाण्यापल्याडच्या लोकांना हा टोल पावलोपावली भरावा लागतो. परिणामी ठाणेकर या ‘टोल’धाडीमुळे त्रस्त झाले आहेत.

तुम्ही कळव्यात राहता आणि तुम्हाला मुंबईला स्वत:च्या गाडीने जायचे आहे? खिशात शंभर रुपये फक्त टोलसाठी वेगळे ठेवा. हा टोल काही दोन्ही बाजूंचा नसून फक्त एका बाजूसाठीचा आहे, हेदेखील विसरू नका! याचे मुख्य कारण म्हणजे ठाण्याच्या पलीकडे उभे असलेले टोलनाके! टोलचा प्रश्न राज्यभरात गाजत आहे. राज्यात पसरलेल्या या टोलनाक्यांपकी काही मोजके टोलनाके कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. मात्र त्यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर म्हणजेच ठाण्यापुढील प्रवाशांना काहीच सूट देण्यात आलेली नाही.
ठाणे आणि प्रामुख्याने नाशिक मार्गावरील खारेगावजवळील टोलनाका, मुंब्रा बायपासचा टोलनाका, डोंबिवलीजवळील काटई टोलनाका, घोडबंदर रोडवरील टोलनाका, नाशिक रस्त्यावर पडघ्यापुढील टोलनाका, खारघर येथील टोलनाका आणि मुंबईत शिरण्यासाठी आवश्यक असलेले मुंबई एण्ट्री पॉइंटचे दोन टोलनाके, बाळकुम-भिवंडी मार्गावरील टोलनाका अशा आठ किंवा त्यापेक्षा जास्त टोलनाक्यांना तोंड द्यावे लागले. ठाण्यातून म्हणजेच घोडबंदर रोडवरून नव्या मुंबईकडे निघालेल्या माणसाला सर्वप्रथम पूर्व द्रुतगती महामार्गावरील टोल, त्यानंतर मुलुंड-ऐरोली ब्रिजवरील टोल असे दोन भरभक्कम टोल भरावे लागतात किंवा मग कळवा ब्रिजवरील वाहतूक कोंडीचा सामना करून ठाणे-बेलापूर रस्त्याने जावे लागते. सुदैवाने हा मार्ग अद्याप तरी टोलरहित आहे.
ठाणेकर किंवा त्यापुढील भागातील प्रवाशांची टोल भरण्यासाठी ना नाही. मात्र हा जुलमाचा टोल किती वष्रे भरायचा, याबाबत त्यांच्या मनात असंतोष आहे. तसेच टोलवसुलीच्या मानाने रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे बेतास बात आहेत. ठाणे-नाशिक महामार्गावर दोन टोल ठाणेकरांना भरावेच लागतात. मात्र या महामार्गाला ना सेवा रस्त्याची जोड आहे, ना ठरावीक अंतरांवर स्वच्छतागृहांची सोय! पावसाळ्यात हा रस्ताही खड्डेमय होतो.
घोडबंदर रोडवरून डोंबिवलीला गाडीने जायचे, तरी तीन टोल भरावे लागतात. पहिला नाशिक मार्गावरील खारेगावजवळील टोल, दुसरा मुंब्रा बायपास संपतानाचा टोल आणि तिसरा काटईजवळील टोल! या प्रवासात रस्त्यांची अवस्था किती वाईट आहे, हे कोणत्याही ठाणेकर किंवा डोंबिवलीकर प्रवाशाला सांगण्याची गरज नाही. तसेच नाशिक मार्गाने कल्याणमध्ये जायचे असले, तरी दोन टोल भरावे लागतातच.
या टोलचे शुल्कही काही वर्षांनंतर कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. वास्तविक दर महिन्याला रस्त्यांवर हजारो नवीन वाहने येत आहेत. या वाहनांपकी ५०० वाहने जरी दर दिवशी टोलनाका ओलांडत असतील, तरी दर दिवसाला टोलनाक्यांच्या गंगाजळीत ५०० गुणिले ३० किंवा ३५ एवढी रक्कम जमा होते. ही रक्कम वाहनांच्या दरमहा वाढत्या संख्येमुळे वाढतच जाते. मात्र टोल कमी होण्याऐवजी टोलची रक्कमही वाढत जात आहे. हे गणित कोणी कसे सोडवावे, हा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
रोहन टिल्लू