पर्यटनस्थळांवर अत्यावश्यक सुविधांची वानवा; पर्यटकांचे हाल
विरार : वसई-विरार शहराचा झपाट्याने विकास होत असताना, या विकासात येथील इतिहासाच्या पाऊलखुणा मात्र पुसत चालल्या आहेत. आजही येथील पर्यटनस्थळे मूलभूत सेवासुविधांपासून वंचित आहेत. त्यात शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय अशा अत्यावश्यक सेवासुद्धा उपलब्ध नाहीत. यामुळे पर्यटकांचे मोठे हाल होत आहेत.
वसई-विरार परिसरात विविध पर्यटनस्थळे आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. यात प्रामुख्याने वसईचा किल्ला, अर्नाळा किल्ला, नालासोपारा येथील बौद्ध स्तूप, अर्नाळा येथील महात्मा गांधी यांची अस्थी विसर्जन समाधी त्याचबरोबर वसई-विरारमधील विस्तीर्ण सागरी किनारा, तसेच येथील काही जुने चर्च अशी विविध पर्यटनस्थळे पाहावयास मिळतात. पण या स्थळापर्यंत कोणतीही विकासाची कामे झाली नाहीत. अर्नाळा ते वसई परिसरातील सागरी किनाऱ्यावर दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात, पण या सागरी किनाऱ्यावर साधी पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे. तसेच शौचालयसुद्धा नाही. काही शौचालये बनवली आहेत पण त्यात पाणी नसल्याने कमालीची घाण साचली आहे. यामुळे त्याचा कोणीही वापर करत नाहीत.
सागरी किनाऱ्यावर कमालीची अस्वच्छता आहे. किनारे नियमित साफ केले जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. या कचऱ्यावर भटके कुत्रे वावरत असल्याने त्यांचा पर्यटकांनासुद्धा मोठा त्रास होतो. स्थानिक ग्रामपंचायत पर्यटकांकडून पर्यटन कर वसुली करत असते. पण कर वसुली करूनही कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देत नाही. यात महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अशीच काही परिस्थिती वसईच्या किल्ल्यातसुद्धा आहे. या ठिकाणी शौचालयाच्या निविदा काढून वर्षे लोटली आहेत, पण अजूनही काम सुरू झाले नाही. पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार लवकरच काम सुरू केले जाईल असे सांगण्यात आले. या किल्ल्यात शौचायाल नसल्याने पर्यटक किल्ल्याच्या आवारातच विधी उरकले जातात.
वसईतील अनेक पुरातन वास्तू दुरुस्तीच्या प्रतीक्षेत शेवटच्या घटका मोजत आहेत. नालासोपारा येथील बौद्ध स्तूप याचे उदाहरण आहे. शासनाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने अनेक वेळा या स्तुपाच्या पुनर्विकासाचे दावे केले आहेत. पण आजतागायत कुठलेही काम या ठिकाणी झाले नाहीत. हा स्तूप दरवर्षी पावसाळ्यात खचत आहे. जर लवकरच या स्तुपाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही तर हा पूल नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्य आणि केंद्र सरकार वसईतील पर्यटनस्थळे आणि पुरातन वास्तूंबाबत पूर्णत: उदासीन आहे, मुळात अनेक वास्तुंची नोंदच नसल्याने त्यांचा कोणताही विकास होणे शक्य नाही. यामुळे तिथे कोणत्याही मूलभूत सेवांना वाव नाही. आधी सरकारने या सर्व वास्तूंचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. – श्रीदत्त राऊत, इतिहासतज्ज्ञ, वसई
वॅब्स्को या संस्थेला २ वर्षांपूर्वी वसई किल्ला येथे शौचालय बांधण्याचे काम दिले आहे, पण आजवर हे काम सुरुरू झाले नाही. याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत. – कैलास शिंदे, संवर्धन साहाय्यक, पुरातत्व विभाग, वसई
