अंबरनाथमध्ये नदीकिनारी शोषखड्डे करून प्रदूषके जिरवण्याचा प्रकार
वालधुनी नदीतील वाढत्या प्रदूषणासंदर्भात हरित लवादापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांचे कान उपटल्यानंतरही येथे प्रदूषण पसरवण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. अंबरनाथमध्ये वालधुनी नदीकाठी असलेल्या जीन्स प्रक्रिया उद्योगांतील घातक रसायनयुक्त सांडपाणी कारखान्यालगत शोषखड्डा खणून त्यात जिरवण्यात येत आहे. ही प्रदूषके जमिनीतून झिरपत शेवटी वालधुनी नदीत पोहोचत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे.
श्रीमलंग डोंगररागांमधून उगम पावणारी वालधुनी नदी दोन्ही काठावरील औद्योगिक आणि रहिवासी वस्त्यांमधून कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे कमालीची प्रदूषित झाली आहे. या सांडपाण्यामुळे तसेच कचऱ्यामुळे एका मोठय़ा नाल्यासारखी अवकळा प्राप्त झालेल्या या नदीच्या प्रदूषणाबद्दल पर्यावरण संस्थांनी तक्रारी करूनही प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. उल्हास आणि वालधुनी या दोन नद्यांमधील वाढत्या प्रदूषणाविषयी वनशक्ती या संघटनेने दाखल केलेल्या जनहित याचिकेची दखल घेत हरित लवादाने काठावरील बदलापूर, अंबरनाथ या पालिका तसेच उल्हासनगर आणि कल्याण महापालिकांना शंभर कोटी रुपयांचा दंड ठोठावला. मात्र या प्राधिकरणांची दंड भरण्याची क्षमता नसल्याने राज्य शासनाने दंडाची रक्कम भरण्याचे हमीपत्र दिले आहे.
न्यायालयाने चपराक लगावल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगर महापालिकेने त्यांच्या हद्दीतील जीन्स उद्योगांना बंदीचे आदेश दिले आहेत. येथील कारखान्यांचे वीजपाणीही तोडण्यात आले आहे. मात्र, अंबरनाथ पूर्वेकडील जीन्स उद्योग बिनबोभाटपणे सुरू असून येथील रासायनिक सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे समोर येत आहे. अंबरनाथ पूर्व विभागात लोकनगरी वसाहतीच्या मागे वालधुनी नदीपात्रालगत एक जीन्स कारखाना सुरू आहे. या उद्योगाचे रसायनमिश्रित पाणी तिथेच मोठा खड्डा खणून त्यात जिरवले जात आहे. साहजिकच हे प्रदूषित पाणी नदीच्या प्रवाहात मिसळते आहे. वालधुनीचा हा प्रवाह पुढे प्राचीन शिवमंदिराजवळून पुढे उल्हासनगरमध्ये शिरतो. अशा रीतीने अंबरनाथमध्येच वालधुनीचे पात्र प्रदूषित होत असेल तर उल्हासनगर, कल्याणमध्ये संवर्धन मोहीम राबवून काय उपयोग, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी सुधाकर झोरे यांनी केला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांना विचारले असता त्यांनी पाहणी करून कारवाई केली जाईल असे सांगितले.