स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने ठाणे पोलिसांच्या वतीने ‘भिवंडी मॅरेथॉन २०२२’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने भिवंडी शहरात शनिवारी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने ठाणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ठाणे पोलिसांच्या भिवंडी परिमंडळाच्या माध्यमातून भिवंडी मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथाॅनची सुरुवात परशराम टावरे मैदानातून सुरू होणार असून शांतीनगर पोलीस ठाणे येथे ही स्पर्धा समाप्त होणार आहे. स्पर्धेमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.
असे आहेत वाहतूक बदल
रांजनोली नाका येथून भिवंडी शहरात वाहतूक करणाऱ्या वाहनांना साईबाबा जकात नाका, रांजनोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने साईबाबा जकात नाका येथून वळण घेवून मुंबई-नाशिक महामार्गे माणकोली नाका- अंजूरफाटा-वसई रोडने-ओवळी खिंड-ओवळी गांव- ताडाळी जकातनाका-कामतघर अथवा पाईपलाईनमार्गे वाहतूक करतील.
राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्या आणि कल्याण -डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसगाड्यांना साईबाबा जकात नाका येथे प्रवेश बंदी असेल. प्रवाशांना जकातनाका येथे बसगाड्यांतून उतरविले जाईल.
वाडारोडने नदीनाकामार्गे भिवंडी शहराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांना पारोळफाटा (नदीनाका) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने पारोळफाटा येथून वळण घेवून खोणीगाव, तळवली फाटा, कांबा रोड या पर्यायी मार्गने वसईरोड येथून डावीकडे वळण घेवून कारीवलीमार्गे किंवा विश्वभारती फाटा येथून डावीकडे वळण घेवून गोरसई गावमार्गे वाहतूक करतील.
वडपा तपासणीनाका मार्गे भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना धामणगाव जांबोळी नाका व चाविंद्रा जकात नाका येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने धामणगाव जलवाहिनी जवळ उजवीकडे वळण घेवून पाईपलाईनमार्गे वाडा येथून इच्छित स्थळी जातील. तसेच राज्य परिवहन सेवेच्या एसटीबसगाड्यातील प्रवाशी चाविंद्रा जकात नाका या ठिकाणी उतरवतील व तेथूनच प्रवाशी घेवून बस वळवून इच्छित स्थळी जातील.
मुंबई –ठाणे येथून जुना ठाणे आग्रा मार्गे भिवंडी शहरात जाणाऱ्या जड वाहनांना अंजुरफाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही जड वाहने वसई रोडमार्गाने कारवली जकातनाका आणि विटभट्टीमार्गे इच्छित स्थळी जातील.
ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या आणि एसटी बसगाड्या तसेच हलक्या वाहनांना नारपोली पोलीस ठाणे येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. बसगाड्यातील प्रवासी नारपोली पोलीस ठाण्याजवळ उतरून पुढे जातील. हलकी वाहने ही देवजीनगर किंवा साईनाथ सोसायटी कामतघर रोडने इच्छित स्थळी जातील.