ठाणे : घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामासाठी ठाणे पोलिसांनी ७ जुलैपर्यंत वाहतुक बदल लागू केले आहेत. दररोज रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत हे वाहतुक बदल लागू असतील असे वाहतुक पोलिसांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
घोडबंदर भागात वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मर्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. या कामाचा भाग म्हणून घोडबंदर येथील डोंगरीपाडा परिसरात गर्डर बसविण्यात येणार आहे. गर्डरची वाहतुक करण्यासाठी मानपाडा आणि पातलीपाडा येथील उड्डाणपूलाखालील मार्गिका बंद करावी लागणार आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी या मार्गावर वाहतुक बदल लागू केले आहेत. त्यानुसार, ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर डोंगरीपाडा येथे गर्डर बसविताना पातलीपाडा पूल उतरणीजवळ सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल. येथील वाहने दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेने वाहतुक करुन पुढे मुख्य मार्गाने वाहतुक करतील.
पातलीपाडा उड्डाणपूलाखालील मार्गिकेवरून हिरानंदानी इस्टटेच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना पातलीपाडा उड्डाणपूलाच्या चढणीजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने पातलीपाडा उड्डाणपूल, वाघबीळ उड्डाणपूलाखालून हिरानंदानी इस्टेटच्या दिशेने वाहतुक करतील. मानपाडा पूलाखालून टिकूजीनी वाडीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना मानपाडा चढणीजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने पातलीपाडा उड्डाणपूल येथून मुल्लाबाग येथून टिकूजीनी वाडीच्या दिशेने वाहतुक करतील. हे वाहतुक बदल सोमवारपर्यंत कायम असतील.