दिवाळी खरेदीच्या गर्दीत ठाणेकरांना मुजोरीचे दर्शन
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील जांभळी नाका, राम मारुती मार्ग आणि गोखले मार्गावर ठाणेकर खरेदीसाठी गर्दी करत आहेत. रविवारी सायंकाळी गोखले मार्गावर गर्दीचा कहर झाला असताना ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावलेले आणि आत अंबर दिवा ठेवलेले वाहन रस्त्याच्या मधोमध उभे करत मुजोर मालक आणि चालकाने ठाणेकरांची वाट अडवली. रविवारी दिवसभरात याच मार्गावर ठाणे परिवहन सेवेच्या तीन बसगाडय़ा बंद पडल्या. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन पूर्ण बारगळले. असे असताना या शासकीय मुजोरीमुळे अर्धाअधिक गोखले मार्ग अडविला गेल्याने ठाणेकरांमधून संताप व्यक्त होत होता.
ठाणे शहरातील जांभळी नाका, राम मारुती आणि गोखले मार्गावर कपडे, दागिने आणि भेटवस्तूंची अनेक दुकाने आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात हे रस्ते गर्दीने गजबजून जातात. हे तिन्ही मार्ग ठाणे रेल्वे स्थानकाला जोडण्यात आले असल्यामुळे शहरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. गेल्या काही वर्षांपासून या तिन्ही मार्गावर वाहनांचा भार वाढल्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते. काही महिन्यांपूर्वी गोखले मार्ग मलवाहिन्यांच्या कामासाठी ठिकठिकाणी खोदण्यात आला होता. हे काम अजूनही सुरू आहे. या कामामुळे वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध होत नाही आणि वाहतूक कोंडीत भर पडते. त्यात गेल्या दोन दिवसांपासून जांभळी नाका, राम मारुती आणि गोखले मार्गावर दिवाळीच्या खरेदीनिमित्त नागरिकांची गर्दी वाढली आहे. या गर्दीमुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे.
असे असतानाच रविवारी सायंकाळी ८.१५ वाजता गोखले मार्गावर रस्त्याच्या मधोमध एमएच-०६-बीएम-२४५७ या क्रमांकाची कार उभी करण्यात आली होती. या वाहनामध्ये ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी आणि अंबर दिवा होता. या वाहनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या वाहन मालकाच्या मुजोरीमुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या ठाणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रायगड जिल्ह्य़ातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात या वाहनाची नोंदणी झाली असून त्याच्या मालकाबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
चालकाची मुजोरी
* गोखले मार्गावर मध्येच उभ्या केलेल्या शासकीय वाहनात बसलेल्या चालकाला वाहन बाजूला न्यावे, असे सांगण्यासाठी वाहतूक पोलीस गेले असता चालक मोबाइलवर बोलण्यात मग्न होता. त्याने खरेदीसाठी गेलेल्या मालकाला बोलावून घेतले. मालकाने मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत कार बाजूला घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
* पोलीस हस्तक्षेप करत नव्हते, तोवर चालकाची मुजोरी सुरूच होती, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या वर्दळीच्या रस्त्यालगत मन मानेल त्या पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने या ठिकाणी कोंडी अधिक वाढत असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.