scorecardresearch

शिळफाटा येथील आगीमुळे वाहतूक कोंडी; रोहित्राच्या स्फोटात एकाचा मृत्यू, तर अन्य एक जखमी 

शिळफाटा येथील शिळ -दिवा भागात शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास टोरंट कंपनीच्या विद्युत रोहित्राचा स्फोट आणि वाहिन्यांना लागलेल्या आगीमुळे शिळफाटा ते मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील रेतीबंदर पूल आणि दहिसर मोरीपर्यंत वाहतूक कोंडी झाली.

shilfata blast
शिळफाटा येथील आगीमुळे वाहतूक कोंडी

ठाणे : शिळफाटा येथील शिळ -दिवा भागात शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास टोरंट कंपनीच्या विद्युत रोहित्राचा स्फोट आणि वाहिन्यांना लागलेल्या आगीमुळे शिळफाटा ते मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील रेतीबंदर पूल आणि दहिसर मोरीपर्यंत वाहतूक कोंडी झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी येथील वाहतूक काही कालावधीसाठी बंद केली होती. त्यामुळे कोंडीत अधिक भर पडली. अवघ्या १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तास लागले. स्फोटात विशाल सिंह (३५) या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर, अन्य एकजण जखमी झाला.

आगीचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. या भागातून भारत पेट्रोलियमची (बीपीसीएल) भूमिगत वाहिनी गेली आहे. ही वाहिनी फुटली असावी, असा अंदाज असल्याने आगीची तीव्रता वाढत असल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. आगीमुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात वायुप्रदूषण झाले होते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचेही हाल झाले. मुंब्रा आणि शिळफाटा येथील काही भागातील विद्युतपुरवठाही खंडित झाला होता.

 आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी काही कालावधीसाठी मुंब्रा येथून महापेच्या दिशेने वाहतूक करणारी मार्गिका बंद केली होती. त्यामुळे शिळफाटा ते मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील रेतीबंदपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. कोंडी वाढू लागल्याने दुपारी एकेरी मार्गावरून येथील वाहतूक सुरू करण्यात आली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 04:34 IST
ताज्या बातम्या