ठाणे : निळजे रेल्वेपूलाच्या कामामुळे शिळफाटा मार्गावर कोंडी झाली असल्याने कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असतानाच, मुंब्रा बाह्यवळण (बायपास) मार्गावर बुधवारी सकाळी ट्रक उलटून या मार्गावर तेलाचे बॅरेल फुटले. या अपघातामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ११ नंतर येथील वाहतुक सुरळीत झाली. या वाहतुक कोंडीमुळे नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

वसई येथून ट्रक चालक गुरुमुख सिंग हे त्यांच्या १७ वर्षीय मदतनीससह बंगळूरूच्या दिशेने वाहतुक करत होते. या ट्रकमध्ये २१ टन वजनाचे कारखान्यासाठी लागणाऱ्या तेलाचे बॅरेल होते. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ट्रक मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील कौसा भागात आला असता, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. या अपघातात ट्रकमध्ये असलेले तलाचे बॅरेल फुटून मुंब्रा बाह्यवळण मार्गावर २०० मीटर अंतरापर्यंत तेल सांडले. घटनेची माहिती वाहतुक पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी रस्त्यावर सांडलेल्या तेलावर माती पसरविली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातामुळे येथील वाहतुक एकेरीपद्धतीने सोडली जात होती. त्यामुळे मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर तीन तासाने येथील वाहतुक सुरळीत झाली. तेलाचे बॅरेल संबंधित कंपनीकडून उचलण्यात येणार आहे. अपघातात कोणीही जखमी नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.