लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: घोडबंदर येथील गायमुख घाटात गुरुवारी सकाळी ट्रक बंद पडल्याने गायमुख ते डोंगरीपाडा पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. सलग दुसऱ्या दिवशी घोडबंदर मार्गांवर कोंडी झाल्याने वाहन चालक नाराजी व्यक्त करत आहेत.
आणखी वाचा-ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री बदला, मनसेची आग्रही मागणी; नेमकं कारण काय?
ठाणे येथून गुरुवारी घोडबंदरच्या दिशेने ट्रक जात होता. हा ट्रक गायमुख घाटात गुरुवारी सकाळी ५:४५ वाजताच्या सुमारास आला असता, ट्रक अचानक बंद पडला. गायमुख घाटातील रस्ता अरुंद आहे. तसेच घोडबंदर मार्गावर मेट्रो मर्गिकेचे काम सुरू आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावर गायमुख ते डोंगरीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे या कोंडीमुळे हाल झाले. ट्रक चालक वाहन सोडून पळून गेल्याने त्याचा शोध वाहतूक पोलीस घेत आहेत. त्यामुळे सकाळी ८ वाजल्यानंतर देखील हा ट्रक बाजूला करण्यात आला नव्हता.