डोंबिवली : कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील मानपाडा, काटई नाका, काटई टोल नाका ते पलावा चौक दरम्यान रस्त्यांवर अधिक संख्येने खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे या मार्गिकेवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियोजना बरोबर खड्डे भरण्याची कामे सुरू केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवडाभरा सुरू असलेल्या मुसळधार पावसात प्रवाशांची कोंडी होऊ नये. वाहनांच्या पलावा ते मानपाडा चौक दरम्यान रांगा लागू नयेत म्हणून कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक पलावा चौक, काटई टोल नाका, काटई नाका बदलापूर फाटा, मानपाडा चौकात पाऊस आणि वाहनांच्या वर्दळीमुळे पडणारे खड्डे खडीने बुजविण्याची कामे करत आहेत.

खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो. संथगतीने वाहने धावत असल्याने पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात. अवजड वाहने या रस्त्यावरून जात असतील तर ही वाहने संथगतीने चालविली जातात. त्याचा फटका इतर वाहनांना बसतो. त्यामुळे ही वाहने एका बाजुला ठेऊन मोटार, शाळेच्या बस, अत्यावश्यक सेवेतील वाहने झटपट या मार्गांवर जातील अशी व्यवस्था पत्रीपूल ते पलावा चौक, बदलापूर रस्ता, खोणी भागात केली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ –

पलावा चौक ते मानपाडा चौक दरम्यानचे खड्डे बुजविण्यासाठी कायम स्वरुपी यंत्रणा कल्याण शीळफाटा रस्त्यावर तैनात ठेवावी म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अनेक पत्रे दिली आहेत. त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे एका परिचित ठेकेदाराला हाताशी धरून त्याच्या साहाय्याने या भागात खडीचा ट्रक आणून ठेवण्यात आला आहे. ही खडी रात्री १० वाजल्यानंतर वाहनांची वर्दळ कमी झाली की कोळसेवा्डी वाहतूक विभागाचे पोलीस पलावा चौक ते मानपाडा चौक दरम्यान पडलेल्या खड्ड्यांमध्ये टाकण्याची भरणीची कामे करतात. गेल्या पाच दिवसांपासून हे काम वाहतूक पोलीस रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत करतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.

प्रवासी वाहतूक करणारे खासगी बस, कंपनी कामगार वाहतूक करणारे बस चालक रस्त्यावर वाहन थांबवून प्रवासी घेण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारे बस रस्त्यात थांबल्या की पाठीमागे वाहन कोंडी होते. त्यामुळे या भागात ध्वनीक्षेपक घेऊन आम्ही वाहतुकीचे नियोजन करत आहोत, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

शिंदे सरकारने कल्याण शीळफाटा रस्त्याचे काम लवकर पूर्ण होईल याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून समाज माध्यमातून केली जात आहे.

खड्डयांमुळे वाहनांचा वेग मंदावतो. ते टाळण्यासाठी वाहतूक पोलीस रात्री १० वाजल्यानंतर पहाटेपर्यंत मानपाडा चौक, काटई नाका, बदलापूर रस्ता, पलावा चौकापर्यंत खड्ड्यांमध्ये खडी भरण्याचे काम करतात. त्यामुळे वाहन कोंडी होण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी होते. या रस्त्यावर खड्डे भरणीसाठी एक यंत्रणात तैनात ठेवा अशी पत्रे ‘एमएसआरडीसी’ला दिली आहेत. — रवींद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक विभाग

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police filling potholes at kalyan shil phata road asj
First published on: 12-07-2022 at 15:02 IST