Thane News: ठाणे : मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ठाणे तसेच घोडबंदर मार्गावर अवेळी आणि संथगतीने सुरू असलेल्या अवजड वाहतूकीमुळे कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून अवजड वाहतुकीकरिता पिवळ्या मार्गिकेचा प्रयोग करण्याचा विचार ठाणे वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. पिवळ्या मार्गिकेतून केवळ अवजड तर, त्या शेजारील मार्गिकेतून इतर वाहनांची वाहतूक सुरू ठेवली जाणार असून यामुळे इतर वाहनांचा प्रवास कोंडीमुक्त आणि वेगवान होण्याची चिन्हे आहेत.
अवजड वाहनांना विशिष्ट नियमांनुसार डाव्या बाजूच्या मार्गिकेमधून प्रवास करणे बंधनकारक असते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासारख्या ठिकाणी अवजड वाहनांना डाव्या मार्गिकेचा वापर करणे बंधकारक असून त्याचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जातो. मात्र, ठाणे आणि घोडबंदर मार्गावर या नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. अवजड वाहने सर्वच मार्गिकेवरून वाहतूक करतात आणि त्यांची वाहतूक संथगतीने सुरू असते.
गायमुख घाट परिसरात तर अवजड वाहनांची एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी स्पर्धा लागते आणि यामुळे सर्वच मार्गिका अवजड वाहने अडवितात. चढणीचा रस्ता असल्यामुळे त्यांच्या मागे इतर वाहनांच्या रांगा लागतात. परिणामी, कोंडी होऊन त्याचा परिणाम अंतर्गत मार्गावर होतो.
मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ठाणे तसेच घोडबंदर मार्गावर अवेळी आणि संथगतीने सुरू असलेल्या अवजड वाहतूकीमुळे कोंडी होते. घोडबंदरचा मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचे काम आहे. या कामानंतर रस्ता रुंद होणार असला तरी अवजड वाहन चालकांच्या बेशिस्तपणामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहतुकीकरिता पिवळ्या मार्गिकेचा प्रयोग करण्याचा विचार ठाणे वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे.
ठरवून दिलेल्या या मार्गिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी असलेल्या मार्गिकेतून अवजड वाहन नेल्यास दंड आकारण्याचा विचार आहे. यामुळे इतर मार्गिकेवरून वाहनांची वाहतूक विनाअडथळा होण्याची चिन्हे आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस, महापालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त आस्तिक कुमार पाण्ड्ये, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त (वाहतुक) पंकज शिरसाट, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिका, एमएमआरडीए, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत ठाणे तसेच घोडबंदर मार्गावर अवेळी आणि संथगतीने सुरू असलेल्या अवजड वाहतूकीमुळे कोंडी होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर उपाय म्हणून अवजड वाहतुकीकरिता पिवळ्या मार्गिकेचा प्रयोग करण्याचा विचार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
अवजड वाहतूकीमुळे होणाऱ्या कोंडीवर उपाय म्हणून अवजड वाहतुकीकरिता पिवळ्या मार्गिकेचा प्रयोग करण्याचा विचार सुरू आहे. पिवळ्या मार्गिकेतून केवळ अवजड तर, त्या शेजारील मार्गिकेतून इतर वाहनांची वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. ठरवून दिलेल्या या मार्गिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी असलेल्या मार्गिकेतून अवजड वाहन नेल्यास दंड आकारण्याचा विचार आहे. ही मार्गिका डाव्या की उजव्या यापैकी कोणत्या बाजूला असावी, याची चाचपणी सुरू आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले.
