कोपर पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी
डोंबिवली पश्चिमेत जाणाऱ्या वाहनांची संख्या रविवारी रात्री अचानक वाढली. कोपर पुलावरून येजा करणाऱ्या वाहनांचा भार वाढल्याने पुढे जाण्याच्या स्पर्धेत जागोजागी वाहने अडकून पडली. कोपर पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने रविवारी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत या परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यात मुसळधार पावसाने डोंबिवलीकरांची त्रेधा उडवली.
डोंबिवली पश्चिमेकडे जाणारी आणि पूर्व भागातून येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाल्यानंतर वाहतूक पोलिसांची ही कोंडी सोडविताना रात्री नऊनंतर धावाधाव सुरू झाली. या दोन तासाच्या कोंडीत एक रुग्णवाहिका अडकली होती. या वाहिकेला बाहेर काढताना नागरिक, पोलिसांची तारांबळ उडाली.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक नागरिक आपले वाहन घेऊन बाहेर पडतात. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रविवारी डोंबिवलीच्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खासगी वाहनांची रांग दिसते. रविवारी सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने नागरिक परतीच्या वाटेला लागले. एकाच वेळी शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली. डोंबिवली पश्चिमेत जाण्यासाठी कोपर उड्डाण पूल हा एकमेव पर्याय आहे. शिळफाटय़ाकडून, कल्याणहून येणारी वाहने मानपाडा रस्ता, ठाकूर सभागृह, केळकर रस्ता, दत्तनगर भागातून येणारी वाहने एकाचवेळी कोपर पुलाच्या दिशेने वळल्याने या भागात वाहतूक कोंडीला सुरुवात झाली.
अखेर पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक पोलीस, सेवकांचा ताफा कोपर पुलावर दाखल झाला. पोलीस मित्र सुप्रिया कुलकर्णी, महाविद्यालयीन तरूण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नियोजनबध्दपणे दोन तास कोंडीत अडकलेल्या नागरिकांची सुटका केली.
प्रत्येकाची घाई..
प्रत्येक जण घरी जाण्याच्या घाईत असल्याने गल्लीबोळ शोधून मिळेल त्या रस्त्याने कोपर पुलाच्या दिशेने जात होता. त्यामुळे मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळ वाहनांनी गजबजून गेले. दोन वाहतूक पोलीस ही कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. पण परिस्थिती त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेली.