पालिका मुख्यालय परिसरात वाहतूक कोंडी कायम
ठाणे महापालिका मुख्यालय परिसरात रस्त्यांच्या कडेला उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणावर वाहनांची कोंडी होत असते. शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या पाचपाखाडी परिसरात या वाहनांमुळे उभा राहत असलेला अडथळा लक्षात घेऊन महापालिकेने मुख्यालयालगतच नाल्यावर वाहनतळ उभारले. कचराळी तलावाजवळील नाल्यावर उभारण्यात आलेल्या या वाहनतळाचे गाजावाजा करीत महिनाभरापूर्वी शुभारंभही करण्यात आला. महिना उलटूनही या वाहनतळामध्ये वाहने उभी करण्यास नागरिक फारसे उत्सुक नसल्याने महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला खो बसला आहे. मुख्यालयाबाहेर वाहने उभे करणारे नगरसेवक तसेच प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही या वाहनतळाकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे मुख्यालय परिसरात कोंडीचे चित्र कायम आहे.
महापालिका मुख्यालय आवारात वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नगरसेवक, अधिकारी आदींना वाहने रस्त्यांवर उभी करावी लागतात. याशिवाय, मुख्यालयात विविध कामानिमित्त येणारे नागरिकांची संख्या मोठी असते. त्यांनाही वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. या रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठय़ा रांगा लागत असल्याने या भागातील वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभा तसेच अन्य कार्यक्रमांच्या वेळी या भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या पाश्र्वभूमीवर महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलावाजवळील नाल्यावर स्लॅब टाकून ३० चार चाकी वाहनांकरिता वाहनतळ उभारण्यात आले. त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले. यामुळे मुख्यालय परिसरातील रस्त्यांवर उभी राहणाऱ्या वाहनांकरिता सुविधा मिळेल. तसेच वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होईल, अशी आशा व्यक्त होत होती. मात्र, ती आता फोल ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्यालय परिसरातील वाहनांचे चालक आजही रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्याचे चित्र आहे. या वाहनतळांमध्ये वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तिथे उपलब्ध नसते. त्यामुळे महिनाभरापूर्वी उद्घाटन झालेले वाहनतळ बेवारस अवस्थेत आहे.