कल्याण : रमजान ईदनिमित्त कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी इदगाह येथे रस्त्यावर नमाज पठणाचा कार्यक्रम मुस्लीम समाजातर्फे केला जातो. त्यामुळे ३ व ४ मे रोजी ईदनिमित्त नमाज पठणाच्या वेळी गोिवदवादी बाह्यवळण रस्ता, दुर्गामाता चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसेच या दोन दिवसांत सर्व प्रकारची अवजड वाहने, बहुचाकी वाहनांना कल्याण शहरातून प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
प्रवेश बंद – कल्याण शहरातून शिवाजी चौकातून लाल चौकी दिशेने येऊन भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लाल चौकी येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी रस्ता – लालचौकी येथे प्रवेश बंद केलेली सर्व प्रकारची वाहने उजवे वळण घेऊन आधारवाडी चौक येथून वाडेघर सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – भिवंडीकडून कल्याण शहरातील आग्रा रस्ता मार्गे गोिवदवाडी बाह्यवळण रस्ता येथून कल्याणमध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी रस्ता – ही वाहने दुर्गामाता चौक येथे डावे वळण घेऊन वाडेघर सर्कल येथून इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातून पत्रीपूल मार्गे गोिवदवाडी बाह्य रस्त्याने दुर्गामाता चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपूल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी रस्ता – पत्रीपूल येथे रस्ता बंद केल्याने कल्याण पूर्व, शिळ फाटा दिशेकडून येणारी वाहने शिवाजी चौक, लालचौकी येथे उजवे वळण घेऊन आधारवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
अवजड वाहने बंद
कल्याण शहरातील द्रु्गाडी चौक, गोविंदवाडी बाह्यवळण रस्ता, पत्रीपूलमार्गे दुर्गाडी चौक, शिवाजी चौक मार्गे होणाऱ्या कंटेनर, ट्रेलर, बहुचाकी, अवजड वाहनांना रमजान ईदच्या दोन्ही दिवशी शहरात प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. या वाहनांच्या चालकांनी पर्यायी रस्ता मार्गे इच्छित स्थळी जावे. रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमन वाहने, इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हा नियम लागू नाही, असे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
