ठाणे : ठाण्यातील कळवा खाडी परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतुक पोलिसांनी शुक्रवारपासून साकेत, कळवा नाका भागात वाहतुक बदल लागू केले आहेत. त्यामुळे शहरात पर्यायी मार्गावर भार होऊन कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कळवा नाका भागात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील आगरी-कोळी समाज कळवा नाका येथे खाडी परिसरात एकत्र येतात. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील परिसरात आयोजन केले जाते. त्यामुळे या भागाला जत्रेचे स्वरुप प्राप्त होत असते. या कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतुक पोलिसांनी बदल लागू केले आहेत. त्यासंदर्भाची अधिसूचना पोलिसांनी प्रसिद्ध केली.

क्रिकनाका येथून उर्जिता उपाहारगृह मार्गे पोलीस मैदान, कोर्टनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना उर्जिका उपाहारगृह येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने क्रिकनाका, उर्जिता उपाहारगृह येथून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, जीपीओ मार्गे वाहतुक करतील.

साकेत मार्गे सिडकोच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना टीएमटी आणि एनएमएमटीच्या बसगाड्यांना राबोडी वाहतुक उपविभाग कार्यालय येथे प्रवेशबंदी असेल. येथील वळण घेऊन पुन्हा साकेतच्या दिशेने वाहतुक करतील. ठाणे शहरातून कळवा उड्डाणपूल मार्गे नवी मुंबईत वाहतुक करणाऱ्या खासगी, राज्य परिवहन सेवेच्या एसटी बसगाड्यांना कॅडबरी सिग्नल, गोल्डन डाईज नाका आणि खोपट सिग्नल येथे प्रवेशबंदी आहे. ही वाहने पूर्व द्रुतगती मार्गावरून कॅडबरी सिग्नल येथून कोपरी पूल, मुलुंड टोलनाका, ऐरोली मार्गे किंवा गोल्डन डाईज नाका, खारेगाव टोलनाका, पारसिक नाका मार्गे वाहतुक करतील. गोल्डन डाईज नाका येथून जीपीओ मार्गे क्रिक नाका येथे वाहतुक करणाऱ्या चार चाकी वाहने, अवजड वाहने आणि मालवाहू वाहनांना गोल्डन डाईज नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने साकेत पूल, खारेगाव टोलनाका, पारसिक चौक मार्गे वाहतुक करतील. तसेच ही वाहने कॅडबरी जंक्शन , कोपरी, मुलुंड टोलनाका, ऐरोली मार्गे देखील वाहतुक करु शकतात.

हे वाहतुक बदल शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत लागू असतील. पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक वाहनांना ही अधिसूचना लागू नसेल असे पोलिसांनी स्पष्ट केले.