ठाणे : धर्मवीर आनंद दिघे साहेब हे त्याग, निष्ठा आणि समर्पणाचे मूर्तीमंत उदाहरण होते. त्यांचे नाव घेण्याचा नैतीक अधिकार शिंदे गटाला नाही. धर्मवीर आनंद दिघे यांचे सर्वस्व हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होते. तर, शिंदे गटाचे सर्वस्व हे सत्ता आहे. एका बाजूला आनंद दिघे असतानाच दुसऱ्या बाजूला राक्षसी महत्त्वकांक्षा, सत्तेची लालसा आणि गद्दारी याच्याशी निगडीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी शिंदे गटावर केली.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी वक्तव्य केले होते. आनंद दिघे हे खून खटल्यातून बाहेर पडले ते शरद पवार यांच्यामुळे, असे वक्तव्य आव्हाड यांनी केले. या वक्तव्यावरून शिंदे गटाकडून आव्हाड यांच्याविरोधात टीका केली जात आहे. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेतली.




हेही वाचा – डोंबिवलीत विजयनगर सोसायटी भागातील काँक्रीटचा रस्ता खचला
गेले दोन दिवस डॉ. जितेंद्र आव्हाड यांंच्या धर्मवीर आनंद दिघेसंबंधी वक्तव्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद ऐकत असताना, धर्मवीर आनंद दिघे यांना शरद पवार यांनी टाडा लावला का? जामीन देताना शरद पवार हे न्यायाधीश होते का? असे सवाल उपस्थित करून पुन्हा एकदा आपल्या बौद्धिक दरिद्रीपणाचे दर्शन जगाला घडविल्याची टीका परांजपे यांनी म्हस्के यांच्यावर केली. मला या निमित्ता्ने एकच सांगायचे आहे की, शरद पवार हे १९६७ पासून सार्वजनिक जीवनात आहेत. त्यांनी व्यक्तीगत जीवनामध्ये अनेकांना मदत केलेली आहे. मात्र, त्यांनी ती कधीच कोणाला दाखवून त्याचे सार्वजनिक वक्तव्य केले नाही. त्यामुळे १९८८-८९ साली ज्या काही घटना घडल्या, त्याबाबत वक्तव्ये करताना नरेश म्हस्के यांनी तारतम्य बाळगायला हवे. आनंद दिघे हे माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी गुरुवर्य, धर्मवीर आणि दैवत आहेत. पण, धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनकाल पाहिला तर त्यांनी आपल्या जीवनात त्याग, समर्पण आणि निष्ठा यास त्यांनी अनन्यसाधारण महत्त्व दिले होते. त्यांनी आपली निष्ठा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चरणी वाहिली होती. असे परांजपे म्हणाले.
माझे वडील दिवंगत प्रकाश परांजपे हे महापौरपदाचे उमेदवार होते. एका मताने त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आदेशावरून ठाणे महापालिकेच्या ३३ नगरसेवकांनी राजीनामे देऊन तीन वर्षे शिवसेना सत्तेच्या बाहेर बसली. हे धारिष्ट्य आताचे मुख्यमंत्री दाखवतील का? वारंवार शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे त्यांना राजीनामा देऊन निवडणूक लढविण्याचे आव्हान देत आहेत. लोकांसमोर जाऊन जनमत घेण्याबाबतही सूचवित आहेत. याबाबत मुख्यमंत्री आव्हान स्वीकारणार आहेत का? असा प्रश्न परांजपे यांनी केला.
डॉ. जितेंद्र आव्हाड हे गेले ३५ वर्षे एकाच नेत्याच्या मागे त्यांचे बोट धरून चालत आहेत, ज्यांचे नाव आहे शरद पवार! त्यामुळे एका बाजूला धर्मवीर आनंद दिघे जे अनेकांसाठी दैवत आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्ही राक्षसी महत्त्वकांक्षेपोटी शिवसेना पक्ष फोडला, चिन्ह चोरले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे म्हस्के यांना बोलण्याचा कुठलाही नैतीक अधिकार नाही. म्हणूनच शरद पवार यांच्याबद्दल बोलताना तारतम्य पाळा. इतिहासाची उजळणी करायला लावू नका. धर्मवीर आनंद दिघे असताना म्हस्के यांना स्वीकृत नगरसेवकही केले नाहीत. आपण भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष होतात. पण, आपल्याला उमेदवारीही दिली नाही. सन २००२ मध्ये म्हस्के हे स्वीकृत नगरसेवक झाले आणि २०१२ मध्ये लोकांमधून निवडून आले, अशी टीकाही परांजपे यांनी केली.