ठाणे : ठाणे शहर पोलीस दलात आणखी ३१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये दोन साहाय्यक पोलीस आयुक्त, १३ पोलीस निरीक्षक, चार साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १२ उपनिरीक्षकांचा सामावेश आहे. ३१ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नवी मुंबईतील एका साहाय्यक पोलीस आयुक्ताची आणि मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस निरीक्षकांची ठाणे पोलीस दलात बदली झाली आहे. तर उर्वरित अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. सह आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी हे बदलीचे आदेश काढले आहेत.

नवी मुंबई पोलीस दलातील साहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांची बदली ठाणे पोलीस दलातील मुख्यालयात करण्यात आली आहे. तर मुख्यालयाचे साहाय्यक पोलीस आयुक्त अरिवद वाढणकर यांची बदली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत करण्यात आली आहे. राबोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र वळतकर यांची नौपाडा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांची शहर वाहतूक शाखेत, नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी, विठ्ठलवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात यांची विशेष शाखेत, जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांना बदलापूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे सर्जेराव कुंभार यांची चितळसर पोलीस ठाण्यात, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांची नियंत्रण कक्षात, बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख यांचीही नियंत्रण कक्षात बदली झाली.

चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांची कासारवडवली पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. भोईवाडा पोलीस ठाण्याचे सुनील गवळी यांची कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बदली झाली. मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांची कोळसेवाडी, विजय गायकवाड यांची वाहतूक शाखेत तर गोरखनाथ पाटील यांची मुंब्रा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.