कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेची रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णसेवा देण्याऐवजी पालिकेच्या मुख्यालयात वैद्यकीय विभागातील निविदा प्रक्रिया, बाह्यस्त्रोत नोकरभरती, रुग्णालयांचे नुतनीकरण आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये वेळ घालविणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आयुक्त अभिनव गोयल यांनी सोमवारी तडकाफडकी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमध्ये रुग्ण सेवेसाठी बदल्या केल्या.
वैद्यकीय विभागातील या बदल्यांमुळे पालिकेत विविध स्तरातील कर्मचारी समाधान व्यक्त करत आहेत. पालिकेच्या कल्याणमधील मुख्यालयात वैद्यकीय विभागात ठराविक सहा ते सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मक्तेदारी होती. वैद्यकीय विभाग हा संवदेनशील विभाग असल्याने कधीही कोणत्या आयुक्ताने वैद्यकीय विभागातील बदल्या, तेथील झाडाझडतीकडे लक्ष दिले नाही. गेल्या दोन महिन्याच्या काळात पालिका रुग्णालयांमध्ये घडलेल्या गैरप्रकारांमुळे आयुक्त अभिनव गोयल यांनी वैद्यकीय विभागाचा दोन महिने निरीक्षण केले. या विभागात वर्षानुवर्ष एकाच जागी असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना हटविणे गरजेचे असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. याशिवाय वैद्यकीय विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याकडेही काही जाणकारांनी वैद्यकीय मुख्यालयातील अधिकाऱ्यांची बदली होणे महत्वाचे आहे, याविषयी तक्रारी केल्या होत्या.
पालिका मुख्यालयातील वैद्यकीय अधिकारी पालिका रुग्णालये, आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णसेवा देण्याऐवजी मुख्यालयातील वैद्यकीय साधनसामग्रीच्या निविदा प्रक्रिया, ठेकेदार नियुक्ती, बाह्य स्त्रोत कर्मचारी नियुक्तीच्या प्रक्रिया पार पाडणे यामध्येच व्यस्त राहत होते. पालिका रुग्णालये, आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे याची त्यांना फिकीर नव्हती. मागील दोन वर्षात वैद्यकीय विभागात सर्वाधिक अनागोंदी माजली होती.
पालिकेची वैद्यकीय सेवा सुस्थितीत चालवायची असेल तर मुख्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांना बदलणे खूप गरजेचे आहे हे आयुक्त गोयल यांच्या निदर्शनास आले. आयुक्तांनी या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून तेथे नवे वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले आहेत. आयुक्तांनी वैद्यकीय मुख्यालयात निविदा प्रक्रिया पार पाडणारे, रुग्णालय नुतनीकरण, सोनोग्राफी केंद्र नुतनीकरण आणि वैद्यकीय सामग्री खरेदी प्रकरणातील बहुद्देशीय कर्मचाऱ्यांची उचलबांंगडी करण्याची मागणी पालिकेतून होत आहे.
बदली वैद्यकीय अधिकारी
पालिका मुख्यालयात क्षयरोग विभागातील डाॅ. विनोद दौंड यांची डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय, साथरोग नियंत्रण अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांची डोंबिवलीतील मढवी आरोग्य केंद्रात, मुख्यालय आरोग्य विभागातील डाॅ. समीर सरवणकर यांची कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात बदली करण्यात आली आहे.
मढवी आरोग्य केंद्रातील डाॅ. पौर्णिमा ढाके, शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅ. संदीप मुकणे, रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रज्ञा टिके यांची पालिका मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. वसंत व्हॅली रुग्णालयातील डाॅ. सपना रेपाळे यांच्याकडे मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.
प्रशासकीय कामाच्या सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या कामाच्या ठिकाणी हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. अभिनव गोयल, आयुक्त.