ठाकरे नंदुरबार येथे तर कोथमिरे गडचिरोलीत
ठाणे : परमबीर सिंह यांच्याकडे ठाणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार असताना सातत्याने चर्चेत राहिलेले ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेतील युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने काढले आहेत. नितीन ठाकरे यांची नंदुरबार येथे तर राजकुमार कोथमिरे यांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे.
हे दोन्ही अधिकारी पाच वर्षे गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत होते. परमबीर सिंग आणि राज्य सरकारमधील वादाच्या पाश्र्वभूमीवर मोक्याच्या ठिकाणी कार्यरत राहिलेल्या या अधिकाऱ्यांना थेट नंदुरबार आणि गडचिरोलीत पाठविण्यात आल्याने या बदल्यांची चर्चा पोलीस दलात जोरात आहे.
ठाणे पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण विभागात २०१५ पासून वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नितीन ठाकरे कार्यरत होते. २०१७ मध्ये त्यांनी ठाण्यातील बनावट कॉलसेंटरचे जाळे उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या बनावट कॉलसेंटरद्वारे अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली जात होती. सुमारे ५०० कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याची माहिती समोर आली होती. या घोटाळ्याची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली होती. त्यानंतर २०१८ मध्ये कॉल तपशील (सीडीआर) प्रकरणात काही गुप्तहेरांना अटक करण्यात आली होती. या गुप्तहेरांकडून काही बॉलीवूड अभिनेत्यांनीही सीडीआर विकत घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. आभासी चलनाद्वारे (क्रिप्टो करन्सी) होणारा घोटाळीही त्यांच्या काळात उघडकीस आला होता. परमबीर सिंह यांच्याकडे ठाण्याचे आयुक्तपद असताना गुन्हे अन्वेषण विभागाने केलेली ही कारवाई चर्चेत आली होती. या काळात ठाकरे यांचा पोलीस दलात दबदबा निर्माण झाला होता. त्यांची आता राज्य सरकारने नंदुरबार येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत बदली केली आहे.
राजकुमार कोथमिरे हे जून २०१६ पासून खंडणीविरोधी पथकात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत राहिले आहेत. निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे खंडणीविरोधी पथकात असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोथमिरे यांच्या पथकाने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर क्रिकेटमधील सट्टेबाजी प्रकरणी सट्टेबाज सोनू जालान यालाही त्यांनी अटक केली होती.