ठाणे : भिवंडी येथे एका २३ वर्षीय किन्नरने प्रियकराच्या त्रालासा कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी किन्नरच्या २८ वर्षीय रिक्षा चालक प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. किन्नरच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी येथील कामतघर भागात २३ वर्षीय किन्नर हा त्याचा आई, भाऊ यांच्यासोबत वास्तव्यास होता. तो जोगवा मागूनच उदरनिर्वाह करत होता. मागील वर्षभरापासून तो परिसरातील एका तरुणासोबत फिरत असे. तो तरुण रिक्षा चालक असून तो अनेकदा किन्नरला घरी देखील सोडण्यासाठी येत असे. किन्नर देखील त्याच्या रिक्षातूनच जोगवा मागण्यासाठी फिरत असे. त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती किन्नरच्या कुटुंबियांना मिळाली होती. रिक्षा चालकाचे वर्तन वाईट असल्याने किन्नरचे कुटुंबिय त्या रिक्षा चालकासोबत जाऊ नको अशी विनंती त्याला करत असे. त्यानंतर महिन्याभरापूर्वी त्या रिक्षा चालकाने भर रस्त्यात किन्नरला मारहाण केली होती, ही घटना किन्नरच्या भावाने पाहिली होती.
अनेकदा किन्नर आणि त्या रिक्षा चालकामध्ये वाद होत होते, या घटनेनंतर तो किन्नर उदास झाला होता. ३१ जुलैला रात्री किन्नर रडत-रडत त्याच्या घरी आला. त्याच्या कुटुंबियांनी रडण्याचे कारण विचारले असता, तो रिक्षा चालक त्रास देत असून कोणाशी बोलायचे नाही, फिरायचे नाही असे धमकावतो. तसेच, कोणासोबत फिरत असल्याचे दिसल्यानंतर मारहाण करतो अशी तक्रार किन्नर याने कुटुंबियाकडे केली. जोगव्याचे पैसे देखील तो रिक्षा चालक घेत असल्याची माहिती किन्नरने दिली. माझ्या जीवाचे काही झाले तर त्याला तोच जबाबदार असल्याचे सांगत किन्नर घरातून पुन्हा निघून गेला.
१ ऑगस्टला सायंकाळी किन्नर याने धामणकर नाका परिसरात आत्महत्या केली. त्याला तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर दु:खाचे डोंगर कोसळले. त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त पसरताच, किन्नर समाजातील इतरजण देखील रुग्णालयात आले. अखेर दुसऱ्या दिवशी किन्नरच्या भावाने संबंधित रिक्षा चालकाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.