झाडांच्या बुंध्यांना लोखंडी ‘कवच’

रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे मुळे कमकुवत होऊन झाडे उन्मळून पडण्याच्या घटना ठाणे शहरात वाढू लागल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)
काँक्रीटपासून रक्षणासाठी वृक्षांभोवती संरक्षक जाळ्या

रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे मुळे कमकुवत होऊन झाडे उन्मळून पडण्याच्या घटना ठाणे शहरात वाढू लागल्या आहेत. त्यामुळे झाडांना भक्कमपणा यावा यासाठी त्यांच्या बुंध्याभोवती संरक्षक जाळय़ा बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

जुन्या ठाण्यातील नौपाडा, पाचपाखाडी तसेच आसपासच्या परिसरातील वृक्षांभोवती संरक्षित लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम सुरू असून यामुळे मुळांना काँक्रीटमुक्ती मिळणार आहे. शहरातील इतर भागांतही लवकरच हा प्रयोग सुरू केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षी पावसाळय़ात झाड या घटनेनंतर शहरातील वृक्षांच्या कमकुवतपणाचा मुद्दा ऐरणीवर आला. टाणे मतदाता जागरण अभियानाचे पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर झाडे उन्मळून पडण्यामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. झाडांच्या बुंध्याभोवती असलेले सिमेंट काँक्रीटीकरण हेच झाडे कोसळण्याचे मुख्य कारण असल्याचा निर्वाळा या तज्ञ समितीने दिला होता. या समितीच्या अहवालानुसार झाडांची मुळे संरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१५ साली राष्ट्रीय हरित लवादाने झाडांच्या बुंध्याभोवती असलेले काँक्रीटीकरण काढण्याचा आदेश मुंबई महानगरपालिकेला दिला होता. ठाण्यात या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. तज्ञ समितीच्या शिफारशीतही झाडांच्या बुंध्यांना कॉक्रिट मुक्ती द्यावी असे सुचविण्यात आल्याने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जुन्या शहरात या निर्णयाची वेगाने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची जबाबदारी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. यानुसार गुरुवारी नौपाडय़ातील बाजीप्रभू देशपांडे रस्त्यावरील झाडांभोवती संरक्षक लोखंडी जाळ्या बसवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

झाडांच्या संरक्षणाच्या संदर्भात वृक्ष प्राधिकरण समितीच्या अधिकाऱ्यांसोबत सातत्याने चर्चा सुरु आहे. त्यानुसार शहरातील झाडांभोवती लोखंडी चौकोनात जाळ्या बसवून काँक्रीटीकरणापासून वाचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून राबवण्यात आला आहे. सध्या नौपाडय़ात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरु आहे.

– सुनेश जोशी, नगरसेवक, भाजप

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Trees iron armor

ताज्या बातम्या