हातावर पोट असणारे आदिवासी बांधव अडचणीत
सागर नरेकर, लोकसत्ता
बदलापूर : करोनाच्या संकटात मोठमोठय़ा उद्योजकांप्रमाणे शहरी भागावर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून असलेले ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागाचे अर्थचक्रही थांबले आहे. जांभूळ, कैरी, छोटे आंबे, चिंचा, बोर, काकडी यांसारख्या रानमेवा, भाज्यांसह वाळवलेले मासे, वाल, कडधान्य अशा वस्तूंची मर्यादित आणि किरकोळ विक्री करणारे आदिवासी, कातकरी कुटुंब टाळेबंदीतील निर्बंधामुळे घरात, गावात, पाडय़ांवर अडकून पडले आहेत. हक्काचा रोजगार बुडत असल्याने फक्त मिळणाऱ्या मदतीवर हे बांधव अवलंबून असून सध्याचा हंगाम हातातून गेल्याची खंत यापैकी अनेक जण व्यक्त करत आहेत. सरकारची मदत किती दिवस मिळणार आणि येणारा पावसाळा कसा काढणार, असा प्रश्न या जनतेपुढे उभा ठाकला आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरी अर्थकारण कोलमडून पडले असून नागरिक घरांमध्ये कोंडले गेले आहेत. शहरांप्रमाणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या वेशीही गेल्या महिनाभरापासून बंद करण्यात आल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम शहरावर अवलंबून असलेल्या ग्रामीण अर्थकारणावरही आता दिसू लागला आहे. उन्हाळ्यात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, अंबरनाथ, शहापूर, कल्याण, भिवंडी, तर पालघर जिल्ह्य़ातील वाडा, विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यांतील आदिवासी बांधव जांभूळ, करवंद, कैऱ्या, चोखून खाण्याचे छोटे गावठी आंबे, चिंचा, बोर अशी फळे जंगलातून गोळा करून ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या शहरांमधल्या बाजारांत जाऊन विकतात. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हा रानमेवा, ग्रामीण भाज्यांना या काळात शहरांमधून मोठी मागणी असते. त्यामुळे अनेक ग्रामीण कुटुंबांचे वर्षांचे अर्थकारण या दोन-तीन महिन्यांवर अवलंबून असते. मात्र, करोनामुळे जाहीर टाळेबंदीने हे गणित कोलमडून पडले आहे.
शहरांमध्ये विशेषत: अंबरनाथ, बदलापूर भागांतल्या जांभळांना मोठी मागणी होती. आदिवासी महिला जांभूळ गोळा करून बाजारात येत होत्या. मात्र टाळेबंदीमुळे त्यांना घरातच अडकून राहावे लागते आहे. जिल्ह्यातून जाणारे मुंबई-आग्रा, मुंबई-पुणे महामार्ग, कल्याण-अहमदनगर राज्यमार्गावर ग्रामीण भागात हेच बांधव रस्त्याच्या कडेला उन्हाळ्यात तात्पुरते मांडव घालून रानमेव्याची विक्री करत होते. मात्र जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने ग्राहकच मिळेनासा झाल्याचे चित्र आहे. ज्या जंगलांवर आयुष्य काढले त्याच जंगलात आता संचार करता येत नसल्याने त्यांची आर्थिक नाकेबंदी झाली आहे.
गावठी कोंबडी, अंडी, वाल, कडधान्यांची विक्री बंद
ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी या शहरांसह ग्रामीण भागातील गावांमध्ये आठवडी बाजारात किंवा दारोदारी फिरून आजही गावठी कोंबडी आणि गावठी अंडय़ांची विक्री केली जाते. मात्र, टाळेबंदीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा हा रोजगारही ठप्प झाला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिक वाल, कडधान्य विक्रेते वर्षभर सुकवून उन्हाळ्याच्या विक्रीसाठी बाहेर काढतात. मात्र, गावांच्या वेशीवर अडवल्याने त्याची विक्रीही बंद झाली आहे.
सुकी मासळीही संकटात
मुरबाड, शहापूर तालुक्यांतील जलसाठय़ांवर स्थानिक कातकरी बांधव मंगुर, कोलबी, तेलप्पा, पात्या, चिचे, मळे, चिंगल्या किंवा कळवाल्या अशा प्रकारचे गावठी मासे गोळा करत असतात. त्यातील काही मासे उकळून मग सुकवून त्यांची विक्री केली जाते. ग्रामीण भागातील शेतघरांवर येणारे खवय्ये, गावातील ग्रामस्थ हे मासे विकत घेतात. महामार्गावरून जाणारे प्रवासी यांचे हमखास ग्राहक असतात, मात्र टाळेबंदीमुळे या माशांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत.