बदलापूरः बदलापूर शहराच्या पश्चिमेत वालिवली परिसरात बारवी धरण रस्त्यावर नियंत्रण सुटलेल्या ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण जखमी असल्याची माहिती मिळते आहे. हा ट्रक इतका वेगात होता की त्याच्या मार्गात येणाऱ्या रिक्षा, दुचाकी पालापाचोळ्यासारखा उडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. यात मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
बदलापूर शहराची भौगोलिक स्थान हे डोंगराच्या पायथ्याशी आणि नदीच्या किनारी आहे. शहरात विविध ठिकाणी तीव्र चढ उतार आहेत. पश्चिमेत या चढ उतारांचे प्रमाण अधिक आहे. बदलापूर शहराच्या प्रवेशद्वारापासून मुरबाडकडे जाणारा बारवी धरण रस्ता आहे. हा रस्ता वडवली, वालिवली, एरंजाड भागातून पुढे जातो. या मार्गावर वडवली, वालिवली येथे चढ उतार आहेत. त्यातील वालिवली येथील उतार हा अतिशय तीव्र आहे. त्यामुळे येथे अनेकदा अवजड वाहने बंद पडतात. तर उतारावरून पुढे जाताना अनेकदा वाहनांचे नियंत्रण सुटते.
शनिवारी सकाळी साडे सातच्या सुमारास अशीच एक घटना या वालिवली भागात घडली. माल वाहतूक करणारा एक ट्रक वालिवलीच्या याच उतारावरून मुरबाडच्या दिशेने जात होता. उतारावर काही अंतरावर येताच या ट्रकचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक भरधाव वेगाने उल्हास नदीच्या पुलाकडे जात होता. या मार्गात येणाऱ्या अनेक वाहनांना त्याने उडवले. त्याचवेळी रस्त्यावर चालणाऱ्या आणि उभ्या असलेल्या पादचाऱ्यांनाही या ट्रकने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या भागातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये या भरधाव ट्रकचा प्रवास टिपण्यात आला आहे. यात हा ट्रक रस्त्यावर वेगाने धावतो आहे.
त्यासमोर येणारी वाहने, पादचारी पळताना दिसत आहेत. तर त्याचवेळी एका रिक्षाला या ट्रकने जोरदार धडक दिल्याने तिचा चेंदामेंदा झाल्याचे दिसते आहे. यात तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच एक दुचाकीही या ट्रकच्या मार्गात आल्याचे दिसते आहे. पुढे एका खासगी गृहसंकुलांच्या पुढे जाऊन हा ट्रक थांबला. येथे असलेल्या एका चारचाकीला या ट्रकने जोरदार धडक दिली. यात एक व्यक्ती दाबला गेला होता. त्याला क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आले असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात आणखी एक कारला धडक दिली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत या ट्रकला काढण्यासाठी वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस, अग्नीशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने काढण्यात यश आले नव्हते.
जखमी डोंबिवलीच्या एम्समध्ये
यात जखमी झालेल्या दोघा जणांना डोंबिवलीतील एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर महिलेचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातील चालक जखमी असल्याची माहिती मिळते आहे. अपघातापूर्वीच त्याने गाडीतून उडी मारल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.