एखादी संस्था स्थापन करून आपल्या ध्येयधोरणांचा, उद्दिष्टांचा विसर न पडू देता कार्यरत ठेवणे हे एक आव्हानच असते. आणि म्हणूनच क्रीडांगणाच्या माध्यमातून तीन पिढय़ा घडवणाऱ्या ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरते. संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याला ९० वर्षांची परंपरा आहे. व्यापक समाजहिताला प्राधान्य देत ध्येयप्रेरित वृत्तीने आणि नि:स्वार्थ भावनेने केलेले कार्य आणि त्या कार्याला वाहून घेतलेले समर्पित कार्यकर्ते याच्या बळावर मंडळाची ९ दशकांची वाटचाल अविरत सुरू आहे.
१९२५ साली शंकर नारायण यादव (नाना) आणि शंकर पुरुषोत्तम भोईर (काका) यांनी दूरदृष्टीने मावळी मेळ्याची स्थापना केली. कारण तो स्वतंत्र्यप्राप्तीसाठी लढण्याचा काळ होता. स्वत: शंकर यादव यांनी स्वरचित पोवाडय़ाच्या माध्यमातून जनजागृतीचे मौलिक कार्य केले होते. मेळ्याच्या माध्यमातून जोडले गेलेले तरुण स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही संघटित राहायला हवेत असे काकांना प्रकर्षांने वाटत होते. या सामाजिक जाणिवेतूनच मावळी मंडळ संस्थेची स्थापना करण्यात आली. सिव्हिल हॉस्पिटलसमोरील पिंपळपाडा येथील मैदानात मावळी मंडळास सुरुवात झाली. त्या काळी लगोरी, आटय़ापाटय़ा, इ. मैदानी खेळ खेळले जायचे. पुढे मुलांची संख्या वाढल्यावर स्वत:ची जागा घेण्याची गरज भासू लागली. ध्येयप्रेरित संस्थापकांनी या कार्यात खंड पडू नये म्हणून कर्ज काढून गणेश टॉकीजजवळील सध्याची जागा घेतली. पूर्वी चरई भाग हा ठाण्याबाहेर मानला जायचा. हा भाग तेव्हा खूप बकाल होता आणि कित्येक प्रकारचे गैरउद्योग येथे चालत असत. व्यसनाधीनतेचे प्रमाणही बरेच होते. पण आपल्या कार्याच्या बळावर मावळी मंडळाच्या लोकांनी स्थानिकांच्या मनात विश्वास निर्माण केला आणि त्यामुळे आपली मुले ते आशेने मंडळात पाठवू लागले.
त्या वेळी चरईत जी जागा मिळाली होती तेथे एका बाजूला टेकाड होते आणि तेथे मैदान निर्माण करायचे होते. आपापल्या नोकऱ्या सांभाळून सर्व संस्थापक आणि कार्यकर्ते सहकुटुंब दररोज संध्याकाळी तेथे जात असत. रोज टेकाड खणून ती माती समोरील खाचरात हे सर्वजण टाकत असत. चरईत या जागेचा कायापालट संस्थापक, कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय या सर्वाच्या अथक प्रयत्नांना जाते. अशा सांघिक प्रयत्नांमधून अखेर मैदान तयार झाले आणि म्हणूनच माणसांच्या हातांच्या या निर्मितीक्षमतेला, समर्पित वृत्तीला मनापासून सलाम करावासा वाटतो.
१९५० साली हुतुतू संघाने, त्यानंतर ६९ साली मंडळाच्या कबड्डी संघाने लौकिक प्राप्त केला. पुढील काळात तर मावळी मंडळाचा दर्जेदार संघ आणि कबड्डी असे समीकरणच झाले. बदलत्या काळानुसार मूल्यांशी तडजोड न करता नावीन्याचा स्वीकार करण्यास ही मंडळे प्राधान्य देत. आज मंडळाच्या मैदानावर अ‍ॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, कबड्डी, खोखो, फुटबॉल आणि स्केटिंग या खेळांचे प्रशिक्षण अनुभवी क्रीडाप्रशिक्षकांद्वारा दिले जाते. डोंबिवलीच्या भोईर जिमखान्याच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना वयाच्या ४थ्या वर्षांपासून येथे जिम्नॅस्टिकचे मार्गदर्शन दिले जाते. १०० मुले येथे फुटबॉलचे प्रशिक्षण घेत आहेत. एकंदरीत ४०० मुले विविध खेळांचे मार्गदर्शन घेत आहेत. अशा तऱ्हेने ४थ्या-५व्या वर्षी मंडळात येऊ लागली की या खेळांमुळे जोडली जातात. क्रीडांगणावर १० वर्षे खेळल्याशिवाय तहहयात सदस्यत्वासाठी विचार केला जात नाही. अतिशय तावूनसुलाखूनच मंडळातर्फे निवड केली जाते. मावळी मंडळाची व्यायामशाळा २००३ साली अद्ययावत करण्यात आली. पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा असून अत्यंत नाममात्र शुल्क आकारले जाते.
खेळाला प्राधान्य देणारी शाळा काढावी असे मंडळाला सातत्याने वाटत होते. त्यामुळे २००५ साली श्री मावळी मंडळ इंग्लिश मीडिअम हायस्कूल (श्री मावळी मंडळ संचालित) या शाळेची स्थापना करण्यात आली. या शाळेचे वैशिष्टय़ म्हणजे पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक विभागात ग्राममंगल संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हसतखेळत शिक्षणपद्धत राबवली जाते. येथे मुलांसाठी मोठे हवेशीर वर्ग असून प्राथमिक विभागात मुलांसाठी बाके नाहीत तर संपूर्ण वर्गात कारपेट घालण्यात आले आहे. शिक्षिका आणि बाजूला बसलेली मुले अशा तऱ्हेने शिक्षण दिले जाते. इथे मुलांसाठी मॅथस्रूम, फ्री प्लेरूम असे वर्ग असून मुले एका वर्गातून ठरावीक काळानंतर दुसऱ्या वर्गात जातात आणि शिकतात. या पद्धतीमुळे मुले अधिक परिणामकारकरीत्या शिकतात आणि त्यांच्या विविध संकल्पनाही स्पष्ट होत जातात. जे पुढील शिक्षणासाठी भक्कम पाया घालण्याचे काम करत असते.
पुढे माध्यमिक विभागातदेखील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देत शिक्षण दिले जाते. वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे मुळातून आकलन होईल या दृष्टीने शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालय आहे. विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तकाचा उत्तम संग्रह असून ते घरी घेऊन जातात. विद्यार्थ्यांसाठी बोटॅनिकल गार्डन, झुऑलॉजिकल गार्डन आवर्जून तयार करण्यात आले आहे. यंदा शाळेची इ. १०वीची पहिली बॅच आहे आणि त्या दृष्टीने ८वी, ९वीपासूनच विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
विशेषत्वाने नमूद करण्याजोगी बाब म्हणजे इथे इ. १लीपासून शाळेचा प्रत्येक विद्यार्थी रोज (एक घडय़ाळी तास) येथे त्याच्या आवडीचा खेळ खेळतो. फुटबॉल, कबड्डी, अ‍ॅथलेटिक्स, खोखो, जिम्नॅस्टिक यांपैकी कोणताही एक खेळ मुले निवडतात आणि अनुभवी क्रीडा शिक्षकांतर्फे त्यांना मार्गदर्शन दिले जाते. या शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे इथे मैदानावर खेळणारी मुले खरोखरच भाग्यवानच म्हटली पाहिजेत.
मंडळातर्फे गेली ६८ वर्षे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात आहे. ठाणे शहर आंतरशालेय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे हे १७ वर्षे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा ५ वर्षे आयोजित केली जात आहे. तर जिम्नॅस्टिक स्पर्धा २ वर्षे आयोजित केली जात आहे. भविष्यात ही तरुण पिढी घडवण्याचा वसा घेऊन मावळी मंडळाची वाटचाल अशीच अविरत राहील, अशी आशा वाटते.

– हेमा आघारकर