scorecardresearch

“आपले पंतप्रधान बेरोजगारांना पकोडे तळायचे सल्ले देत असतील तर…”, गांधीजींचे नातू तुषार गांधींची परखड टीका!

महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी यांनी देशातील बेरोजगारीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे.

tushar gandhi targets pm narendra modi
तुषार गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका!

आताची शिक्षण व्यवस्था ही गुलामी पद्धतीची असून या पद्धतीत विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही गुलाम झाले आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी सारखे उच्चशिक्षण घेऊन नोकरी मिळत नाही म्हणून आपले पंतप्रधान बेरोजगारांना पकोडे तळायचे सल्ले देत असतील तर मग आपण आपल्या शिक्षणाची सतरा वर्षे शिक्षणात का खर्च करावी? असा परखड सवाल महात्मा गांधीजी यांचे नातू तुषार गांधी मंगळवारी येथे केला.

कल्याण मधील बी. के. बिर्ला महाविद्यालयात राष्ट्रीय युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात 14 राज्यांमधील विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले आहेत. या शिबिराच्या उद्घाटनानंतर गांधी माध्यमांशी बोलत होते. देशात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. गोरगरीब, सामान्य यात होरपळून जात आहे. सामान्यांचा आक्रोश सुरू आहे. या समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसारख्या टूम काढून जनतेला फसवले जात आहे. संविधानाने आपल्याला जे स्वातंत्र्य दिले आहे ते हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका गांधी यांनी केली.

७५ वर्षांत महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत आपण उभा करू शकलो नाही. दारिद्र्य, विषमता, जाती-पाती विवाद, एकतेचा अभाव सारख्या समस्यांनी अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. या समस्यांवरील लक्ष विचलित करण्यासाठी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरे केले जात आहेत, असे गांधी म्हणाले.

करोनाच्या काळात लाखो कामगार आपल्या मूळ प्रांतात निघून गेले. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी नसल्याने ते पुन्हा शहरी भागाकडे वळले आहेत. अशा कामगारांचा प्रश्न सरकार कसा सोडविणार? असा प्रश्न तुषार गांधी यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tushar gandhi slams pm narendra modi on unemployment in india pmw

ताज्या बातम्या