काटई-बदलापूर रस्त्यावरील हेदुटणे गाव हद्दीत वीटभट्टीच्या मागे डोंबिवली, ठाकुर्लीतील गॅस एजन्सीतील सिलिंडर ग्राहकांना देण्याचा बहाणा करून नेऊन, तेथे घरगुती, व्यापारी गॅस सिलिंडरमधील गॅस काढून सिलिंडरमध्ये अफराताफर करणाऱ्या दोन जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. बेल्लप्पा मंगप्पा इरदिन (४३, रा. लोढा हेवन, भवानी चौक, डोंबिवली), महेश गुप्ता (३५, रा. सिध्दीविनायक सोसायटी, सागाव, डोंबिवली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, महेश आणि बेलप्पा यांनी डोंबिवलीतील काही गॅस एजन्सीतील व्यापारी, घरगुती वापराचे सिलिंडर एका टेम्पोमध्ये भरून ग्राहकांना पोहच करण्याच्या बहाण्याने नेले. हे दोघे जण सिलिंडरचा टेम्पो घेऊन ग्राहकांच्या दारात न जाता, ते काटई-बदलापूर रस्त्यावरील हेदुटणे गावाच्या हद्दीतील वीटभट्ट्यांच्या मागे आडोशाला गेले. तेथे त्यांनी टेम्पोतील रिकामे सिलिंडर काढून त्यामध्ये भरलेल्या वाणीज्य, घऱगुती गॅस सिलिंडरमधील गॅस भरण्यास सुरूवात केली. अशाप्रकारे गॅस भरतांना धोका असतो हे माहिती असुनही त्यांनी हा बेकायदा प्रकार केला.

गॅस सिलिंडरच्या किमतीनी एक हजाराचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे कमी किमतीमध्ये गरजूंना सिलिंडर विक्री करण्याचा आरोपी महेश, बेलप्पा यांचा डाव होता. हा चोरून गॅस सिलिंडर भरण्याचा प्रकार एका जाणकाराने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून समाज माध्यमात प्रसारीत केला. मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील हा प्रकार असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. बागडे यांच्या आदेशावरून पोलिसांनी टेम्पोची माहिती काढली. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे काही माहिती मिळवून मुख्य आरोपी महेश गुप्ता याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ठाकुर्लीतील गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरमध्ये अफरातफऱी करणारा कामगार बेलप्पा याला पोलिसांनी अटक केली. या दोघांच्या अन्य तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

त्यांनी आतापर्यंत असे बेकायदा गॅस सिलिंडर भरण्याचे किती वेळा प्रयोग केलेत. असे सिलिंडर त्यांनी कोणाला विकेल आहेत. याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी करत आहेत.