डोंबिवली – लोहपुरूष सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती आणि राष्ट्रीय एकात्मता दिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी सकाळी कल्याण, डोंंबिवलीत पोलिसांनी एकता दौडचे आयोजन केले होते. पोलिसांबरोबर शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी या दौडमध्ये सफेद पेहरावात सहभागी झाले होते. यानिमित्ताने पोलिसांनी दौड असलेल्या भागात पोलिसांची शस्त्रे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली होती.
पोलिसांविषयी आदरयुक्त भीती प्रत्येक नागरिकाच्या मनात असते. पोलीस, अधिकाऱ्यांशी थेट बोलताना कोणीही असो थोडा वचकून असतो. डोंंबिवलीत फडके रस्त्यावर एकता दौडचे आयोजन केले होते. साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, ज्येष्ठ शल्य चिकित्सक डाॅ. अरूण पाटील आणि शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक या एकता दौडमध्ये सहभागी झाले होते. यावेळी फडके रस्त्यावर पोलिसांची बंदूक, कार्बाईन गन, इतर अत्याधुनिक स्वयंचलित बंदुका नागरिकांना पाहण्यासाठी एका मंचकावर मांडून ठेवण्यात आल्या होत्या.
पादचारी नागरिक या मंचकाजवळ येऊन बंदुका पाहून निघून जात होते. काही नागरिक पोलिसांकडून या बंदुकांची माहिती, त्यांचे प्रकार याची माहिती घेत होते. ही माहिती घेत असताना मोठ्या कौतुकाने दोन तरूणी पोलिसांनी मांडलेल्या शस्त्रास्त्रांच्या मंचा जवळ आल्या. त्यांनी मोठ्या कौतुकाने हसत या जुन्या पध्दतीच्या, अत्याधुनिक, स्वयंचलित, कार्बाईन गनची पाहणी केली. पोलिसांकडून या बंदुका कशा पध्दतीने काम करतात याची माहिती घेतली.
त्यानंतर मात्र या तरूणींना या बंदुका हातात घेण्याच मोह आवरला नाही. त्यांनी उपस्थित पोलिसांना ही बंदूक आम्हाला हातात घेऊन पाहता येईल का अशी विचारणा केली. त्यानंतर उपस्थित पोलीस अधिकाऱ्याच्या संमतीने एक कार्बाईन गन या तरूणींनी अलगद मंचावरून उचलली आणि त्यांनी मोठ्या कौतुकाने ती कार्बाईन गन आपल्या हातात घेऊन घरातील लडिवाळ मांजर, श्वानाच्या पिल्लाला आपण कसे प्रेमाने गोंजारतो, पाहतो त्याप्रमाणे या दोन्ही तरूणींंनी ती कार्बाईन गन बारकाईने न्याहळली. त्या गनमधील खटके, त्याची कार्यपध्दती कशी असते याची पोलिसांकडून माहिती घेतली.
एवढी वजनदार गन हातात घेतल्यानंतर या तरूणींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. आपण कधी पोलिसाजवळ जाताना घाबरतो, आता तर आपण पोलिसांजवळ उभे राहून त्यांचे गुन्ह्याच्यावेळी वापरण्यात येणारे शस्त्र आपल्या हातात घेऊन पाहत आहोत याचा वेगळा आनंद या दोन्ही तरूणींच्या चेहऱ्यावर झळकत होता. या एकता दौडच्या निमित्ताने पोलिसांजवळ नागरी संंरक्षणासाठी पोलिसांकडे कोणत्या प्रकारची शस्त्रे असतात याचीही माहिती नागरिकांना मिळाली.
कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात ही एकता दौड पोलिसांकडून काढण्यात आली. शुभ्र सफेद वेशात पोलीस, नागरिक या दौडमध्ये सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या आदल्या दिवशी शहरातील मुख्य चौक, रस्त्यांवर पोलीस बॅन्डकडून राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा भाग म्हणून वादन करण्यात आले.
