कल्याण – कल्याण पूर्वेतील नेतिवली भागातील मेट्रो माॅल समोरील सार्वजनिक रस्त्यावर एका रिक्षेत बसून अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या मुंबई कुर्लातील दोन इसमांना पोलीस उपायुक्तांचे विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कोळसेवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली.
मोहम्मद रफिक अब्दुल सलाम (४६, रा. शफी मंगल चाळ, कुर्ला कुरेशी नगर, कुर्ला पूर्व), अब्दुल सादिक शेख (४८, रा. रफिक इस्टेट, कुर्ला कुरेशी नगर, कुर्ला) अशी अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत. या दोन्ही इसमांकडून पोलिसांनी कोडेन फाॅस्फेट सिरप, अल्फ्राझोलम गोळ्या, अल्पाट्रन गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. गुंगी, नशा येण्यासाठी या औषधांचा वापर करण्यात येत असावा असा पोलिसांना संशय आहे. जप्त केलेला अंमली पदार्थांचा साठा २७ हजार रूपये किमतीचा आहे.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात गस्त घालते. अंमली पदार्थांचे अड्डे शोधून तेथे छापे टाकणे एवढेच काम या पथकाकडे आहे. मागील चार महिन्यांच्या काळात या पथकाने शहरातील बहुतांशी अड्डे उध्दवस्त केले आहेत. अनेक तस्करांना पकडले आहे.
मंगळवारी दुपारी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक साबाजी नाईक, विशेष कारवाई पथकाचे अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार अमित शिंदे, खुशाल नेरकर, राहुल शिंदे कल्याण पूर्वेतील नेतिवली भागातील मेट्रो माॅल परिसरात गस्त घालत होते. गस्तीवरील पथकाला मेट्रो माॅलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर एक रिक्षा उभी दिसली. त्यामधील दोन जण संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळून आले. पथकाने काही वेळ त्यांच्यावर दूरवरून पाळत ठेवली. त्यांना चारही बाजुने घेरल्यानंतर रिक्षेतील दोघांना ताब्यात घेऊन याठिकाणी बसून काय करता, अशी विचारणा केली.
ते दोघे गोंधळले. पोलिसांचा संशय वाढल्याने त्यांची अंगझडती घेतली. त्या झडतीमध्ये त्यांच्या जवळील पिशवीतून प्रतिबंधित बेकायदेशीर कोडेन फाॅस्फेट सिरप आणि इतर दोन गुंगी, नशा येणाऱ्या औषधांचा साठा आढळून आला. ते कुर्ला येथील राहणारे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ते कल्याणमध्ये आल्याची खात्री पटल्यावर या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २७ हजाराचा अंमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला. त्यांच्यावर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तस्कारांनी हा अंमली पदार्थ साठा कोठुन आणला होता. ते तो कोणाला विक्री करणार होतो याचा तपास कोळसेवाडी पोलिसांनी सुरू केला आहे. या विशेष पथकाने काही दिवस डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, माणकोली पूल परिसरातील ढाबे, खारफुटी झुडपांच्या भागात रात्रीच्या वेळेत शोध मोहीम राबवावी. यावेळी अनेक तस्कर, गांजा सेवन करणारे इसम जाळ्यात सापडतील, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.