कल्याण : गेल्या दोन वर्षांपासून दुर्गाडी पूल आणि दुर्गाडी चौकात अभूतपूर्व वाहनकोंडी होत आहे. या रस्त्याला दुसरा पर्याय नसल्याने या वाहन कोंडी आणि गर्दीत शिरून वाहनचालकांना दुर्गाडी पुलावरून मोठय़ा प्रयासाने भिवंडी बावळण रस्त्याकडे जावे लागत होते. मात्र दुगार्डी खाडीवरील नवीन पुलाच्या सहापैकी दोन मार्गिकांचे उद्घाटन सोमवारी करण्यात आल्याने आता ही कोंडी फुटली आहे.
दुर्गाडी पुलावरून बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, कल्याण, टिटवाळा भागातील वाहनांची ये-जा सुरू असते. २० वर्षांपूर्वी खाडीवरील एक पूल धोकादायक झाला. त्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करून दुसरा नवीन पूल उभारण्यात आला. तोही वाहनांना कमी पडू लागला. खाडीवरून भिवंडीच्या दिशेने जाण्यासाठी एकाच पुलाचा वापर करावा लागत असल्याने वाहनचालकांना एक ते दीड तास दुर्गाडी चौकात अडकून पडावे लागत होते. दोन वर्षांपासून नोकरदारांचे सर्वाधिक हाल या कोंडीमुळे झाले. ही कोंडी सोडविण्यासाठी पाच वर्षांपूर्वी दुर्गाडी पुलावर सहा मार्गिकेचा नवीन उड्डाणपूल उभारणीचा निर्णय घेण्यात आला. जुलै २०१६ मध्ये या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. मार्च २०१८ मध्ये या पुलाचे काम पूर्ण करण्याची मर्यादा होती. या पुलाच्या सहा मार्गिकांपैक्ी दोन मार्गिका सुसज्ज केल्या. पावसाळ्यात नोकरदार वर्गाचे हाल विचारात घेऊन तयार झालेल्या दोन मार्गिका वाहनांसाठी खुल्या कराव्यात यावर वाहतूक विभाग, पालिका अधिकारी आणि एमएमआरडीए अधिकारी यांचे एकमत झाले. सहा मार्गिकांची रुंदी ७५ फुटाची आहे. यामधील २५ फुटांच्या दोन मार्गिका खुल्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित ४८ फुटांच्या सहा मार्गिका डिसेंबपर्यंत खुल्या करण्यात येतील, अशी माहिती एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने दिली. खुल्या केलेल्या मार्गिकेतून मुंबई, भिवंडी दिशेने येणारी वाहने कल्याण शहरात येतील. जुन्या पुलावरील दुहेरी वाहतूक थांबवून या पुलावरून भिवंडीकडे जाणारी वाहने धावतील. गेल्या दोन वर्षांपासून एकाच पुलावरून ये-जा करणारी वाहने धावत होती. त्यामुळे पुलावर सतत कोंडी होत होती. नवीन मार्गिका खुली झाल्याने नोकरदारांनी समाधान व्यक्त केले.