शहापूर : शहापूर तालुक्यातील घनदाट जंगलाने व्यापलेल्या माहुली गडावर गुरुवारी गिर्यारोहणासाठी मुंबईहून आलेले दोन तरुण वाट चुकले होते. त्यांचा शहापूर पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेऊन सुखरूप गडावरून खाली आणले. मुंबईच्या मालाड भागातून रंजित झा ( १९ ) आणि आमिर मलिक (२० ) हे दोघेजण गुरुवारी सकाळी दहाच्या सूमारास माहुली गड चढले होते.
त्यानंतर ते दिवसभर गडावर फिरता फिरता रस्ता भरकटले. याबाबत ची माहिती शहापूर पोलीसांना मिळताच त्यांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही तरुणांचा शोध घेऊन त्यांना संध्याकाळी सुरक्षित माहुली गडाखाली आणले.
माहुली किल्ल्याच्या जंगल भागातील पायवाटांची पुरेशी माहिती नसल्याने गिर्यारोहक आणि पर्यटक वाटा भरकटण्याच्या घटना येथे नेहमीच घडत असतात. त्यावेळी गडावरील खडानखडा माहिती असलेले स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेत असतात, असे शहापूर पोलीसांनी सांगितले.