ठाणे : वागळे इस्टेट येथील नेहरुनगर भागात दिवसा ढवळ्या तलवारीने दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हल्ल्यापूर्वीचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. यातील एकजण स्वत:ला परिसरातील शिंदे गटाचा पदाधिकारी असल्याचा दावा पोलिसांपुढे करत आहे. चित्रफीतीत हल्लेखोर तलवार बाहेर काढून धमकावित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आकाश भालेराव (३०) आणि सुरज हजारे (३०) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. पार्किंगच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर येत आहे.
वागळे इस्टेट येथे जखमी अजय देवरस आणि सचिन तासतोडे हे राहतात. अजय याचा वागळे इस्टेट येथील नेहरुनगर परिसरात वाहन धुलाईचा व्यवसाय आहे. मंगळवारी तो सचिन याच्यासोबत वाहन धुलाई केंद्रात बसला होता. त्यावेळी सचिन याला आकाशने मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीची साठे नगर भागात उभे असलेले वाहन बाजूला काढण्यास सांगितले. परंतु सचिन त्याठिकाणी गेला नाही. त्यामुळे आकाश आणि सुरज या दोघांनी त्याला मोबाईलवर संपर्क साधून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आकाश आणि सुरज हे सचिनचा शोध घेत नेहरुनगर येथे गेले. त्यांनी सचिन याच्या सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी आकाश आणि सुरज या दोघांच्या हातामध्ये तलवारी होत्या. त्यांना विरोध केला असता, आकाश याने तलवार हवेत भिरकावून दमदाटी सुरु केली. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. आकाश याने अजय याच्या डोक्यावर तलवार उगारली. तलवारीचा घाव त्याच्या डोळ्याच्या भुवईवर लागला.
त्यानंतर सुरज याने देखील त्याच्या हातातील तलवार अजय याच्यावर उगारली. त्याने हातवर केल्याने त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी सचिन याच्यावर देखील तलवारीने हल्ला चढविला. यात त्याच्या देखील हाताला, पायाला, डोक्याला दुखापत झाली. दोघांनी जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढला.
वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी आकाश आणि सुरज यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, या हल्ल्यापूर्वीच्या घटनेचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाले. त्यानंतर पोलिसांनी आकाश आणि सुरज या दोघांना अटक केली. आकाश हा शिंदे गटाचा पदाधिकारी असल्याचा दावा पोलिसांकडे करत होता. परंतु त्याबाबतची कोणतीही नोंद नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आकाश आणि सुरज यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३ (५), शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम २५, ४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५, ३७ (१), प्रोव्हीबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅव्हेंजर ॲण्ड देअर रिहॅबिलिटेशन २०१३ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.