डोंबिवली : विदेशात आपणास नोकरी लावतो असे सांगून दोन जणांनी विदेशात तरूणांना नोकरी लावण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एका महिलेच्या कंपनीला आणि या कंपनीच्या माध्यमातून विदेशात नोकरीसाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या अकरा जणांना २१ लाख ९६ हजार रूपयांचा गंडा घातला आहे.सोमेश राठोड आणि नवीन सिंग अशी फसवणूक करणाऱ्या दोन जणांची नावे आहेत. या दोघांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता ते बंद येत आहेत. डिसेंबर २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. डोंंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागात यासंदर्भातचे व्यवहार घडले आहेत. या फसवणुकीसंदर्भात विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची परवानगी घेऊन याप्रकरणी दोन जणांच्या विरुध्द भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीप्रमाणे याप्रकरणातील तक्रारदार महिला या डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता भागातील स्वामी विवेकानंद शाळा भागात राहतात. या महिलेची नवी मुंबईत वाशी येथे विदेशात मुलांना नोकरीला पाठविण्यासाठीची नोंदणीकृत कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून अनेक तरूण विदेशात नोकरीसाठी यापूर्वी गेले आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये गु्न्हा दाखल नवीन सिंग आणि सोमेश राठोड तक्रारदार महिलेच्या कंपनीच्या संपर्कात आले. त्यांनी आपणही विदेशात तरूणांना नोकरी लावण्याचे काम करतो अशी खोटी थाप तक्रारदार महिलेकडे मारली. या महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर गुन्हा दाखल दोन इसमांनी आपल्या कंपनीत विदेशात नोकरीला जाण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ११ तरूणांना आपण सिंगापूर येथे नोकरी लावतो असे आश्वासन दिले.
या आश्वासनावर विश्वास ठेऊन तक्रारदार महिलेने आपल्या कंपनीत नोंदणीकृत असलेल्या ११ तरूणांना सिंगापूर येथे नोकरीला पाठविण्याची तयारी या दोन इसमांच्या माध्यमातून केली. या तरूणांचे पारपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या पूर्तता करण्यासाठी या दोन्ही इसमांनी तक्रारदार महिला आणि अकरा तरूणांना सिंगापूर येथे नोकरी लावण्यासाठी टप्प्याने आवश्यक शुल्क वसूल करण्यास सुरूवात केली.
अशाप्रकारे तक्रारदार महिला आणि नोकरीसाठी इच्छुक ११ तरूणांकडून सिंग, राठोड यांनी टप्प्याने एकूण २१ लाख ९६ हजार रूपये उकळले. पैशांचा भरणा केल्यानंतर तक्रारदार महिला आणि नोंदणीकृत तरूण या दोन्ही इसमांकडे विदेशात नोकरीसाठी कधी पाठविणार, नोकरी नियुक्तीची पत्रे, तेथील माहिती देण्यासाठी तगादा लावू लागले. सुरूवातीला हे दोन्ही तरूण वेळकाढूपणा करत तक्रारदार महिलेला उत्तरे देत होते. त्यानंतर त्यांनी महिला आणि ११ तरूणांना प्रतिसाद देणे बंद केले.दीड वर्ष झाले तरी या दोन्ही इसमांनी आपल्याकडील नोंदणीकृत तरूणांना विदेशात नोकरी नाहीच, पण नोकरीच्या बदल्यात आपणाकडून घेतलेले पैसे परत न केल्याने आपली फसवणूक या दोन्ही इसमांनी केल्याची तक्रार महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक शिनकर याप्रकरणाचा तपास करत आहेत. तीन महिन्यापूर्वी कल्याणमध्ये विदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळून सुमारे ५० हून अधिक जणांची फसवणूक केली आहे.