ठाणे : ठाणे पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्याचा गैरवापर करुन मोबाईल क्रमाकांचा काॅल तपशील (सीडीआर) चोरून तो एकाला विक्री केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे.

पोलीस शिपाई आकाश सुर्वे (३६) आणि पोलीस शिपाई हर्षद परब (३१) अशी पोलिसांची नावे असून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. सुर्वे आणि परब यांनी अवघ्या १५ ते २५ हजार रुपयांसाठी सराईत गुन्हेगार मोहम्मद सोहेल मोहम्मद शब्बीर राजपुत (२८) याला सीडीआर विक्री केल्याचे समोर आले.

ठाणे पोलीस दलातील सायबर पोलीस ठाण्यात आकाश सुर्वे आणि हर्षद परब कार्यरत होते. २०२२ मध्ये त्यांची ओळख मोहम्मद सोहेल राजपुत याच्यासोबत झाली होती. त्यांनी राजपुत याला एक महिन्याच्या ‘सीडीआर’साठी १५ हजार रुपये आणि तीन महिन्यांच्या ‘सीडीआर’साठी २५ हजार रुपये आकारले होते. तर एकावेळी स्थळ तपासणी करण्यासाठी (लोकेशन ट्रॅकिंग) एक हजार रुपये घेत होते. याबाबतची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्याअनुशंगाने आकाश सुर्वे आणि हर्षद परब यांना ३ मे या दिवशी पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले. तसेच या गैरप्रकाराबाबत सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३१४, ३१६ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाचे कलम ४६, ६६, ७२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या प्रकरणानंतर सुर्वे , परब आणि राजपुत या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय कोणालीही सीडीआरचा तपशील मिळविण्याची परवानगी नसते. असे असताना सुर्वे आणि परब यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शासकीय ई-मेलचा गैरवापर करुन सीडीआर काढत होते. त्यानंतर हे सीडीआर त्यांनी राजपुत याला विक्री केले. राजपुत हे सीडीआर गुप्तहेर संस्थांना देत होता अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली