ठाणे : भिवंडी येथील वळपाडा भागात भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार हेमल पटेल (३२) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
भिवंडी येथील अंजुरफाटा भागात हेमल पटेल हा त्याच्या कुटुंबासोबत वास्तव्यास होता. तो मुंबईतील पवई येथे एका खासगी कंपनीत कामाला असून शुक्रवारी सकाळी तो कामाला जाण्यासाठी दुचाकीने निघाला होता. त्याची दुचाकी वळपाडा भागात आली असता, एका भरधाव मोटारीने त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातामुळे हेमल हा दुचाकीवरून खाली पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती नारपोली पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती दिली. त्याचे कुटुंबियांनी तेथे आल्यानंतर त्याला परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु तेथील डाॅक्टरांनी त्याला आयजीएम या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्याला आयजीएम रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी हेमल याच्या काकांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.