बदलापूरः गेल्या काही दिवसात हवेचा दर्जा खालावत असल्याची ओरड होत असतानाच बदलापूर आणि उल्हासनगर यासारख्या शहरांचा ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक खराब हवेच्या यादीत समावेश होतो आहे. मात्र शहरातील प्रदुषणापेक्षा केंद्राच्या आसपास असलेल्या परिस्थितीमुळे हवेचा निर्देशांक वाढत असल्याची ओरड होते आहे. खुद्द स्थानिक पालिका प्रशासन याबाबत तक्रारी करत असून तपासणी केंद्राची जागा बदला, अशी मागणी उल्हासनगर आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने केली आहे. उल्हासनगरचे तपासणी केंद्र खेळाच्या मैदानात तर बदलापुरचे केंद्र औद्योगिक वसाहतीमध्ये आहे.

गेल्या काही दिवसात मुंबई आणि उपनगरात हवेचा दर्जा खालावत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या रस्त्यांवर उतरून स्वच्छतेचा आढावा घेतला होता. तसेच सर्वच पालिकांना धुळ नियंत्रणासह विविध उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकांनी धुळ नियंत्रण, रस्ते स्वच्छता, बांधकामाच्या ठिकाणी उपाययोजना करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतरही ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर आणि बदलापूर शहरातील हवेचा दर्जा खालावत असल्याची बाब समोर आली होती.

हेही वाचा… तानसा अभयारण्याच्या लगत प्रदूषणकारी उद्योग

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही दोन्ही शहरातील हवेची गुणवत्ता बिघडली होती. त्यावेळी हवा निर्देशांक सरासरी २०० च्या आसपास असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे दोन्ही शहरात उपाययोजनांवर बोट ठेवले जात होते. मात्र दोन्ही शहरात जी तपासणी केंद्र उभारण्यात आली आहेत ती चुकीच्या ठिकाणी असल्याची बाब समोर आली आहे. खुद्द त्या त्या पालिकांनीच याबाबत आक्षेप घेतला आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात बसवण्यात आलेले तपासणी केंद्र गोल मैदान परिसरात बसवण्यात आले आहे. हे मैदान खेळाचे मैदान असून येथे धुळ उडत असते. त्यामुळे शहराचा हवेचा निर्देशांक वाढलेला दिसून येतो. तर बदलापूर शहरातही तपासणी केंद्र हे खरवई औद्योगिक वसाहतीच्या जवळ आहे. त्यामुळे येथेही हवेचा निर्देशांक चुकीचा दाखवला जाऊ शकतो, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. या दोन्ही पालिकांनी हे केंद्राची जागाच बदलण्याची मागणी केली आहे.

गोल मैदानाजवळ लोकांच्या हालचाली अधिक आहेत. त्यामुळे येथे सातत्याने धुळ उडते. येथील केंद्राची आकडेवारी अधिकच येणार. त्यामुळे हे केंद्र इतर ठिकाणी हलवण्यासाठी आम्ही मागणी केली आहे. – जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त, उल्हासनगर महापालिका.

बदलापूर शहरातील हवा तपासणी केंद्र औद्योगिक क्षेत्राच्या जवळ आहे. हे केंद्र इतर ठिकाणी ठेवल्यास नक्कीच आकडेवारी वेगळी दिसू शकेल. त्याबाबत आम्ही प्रदुषण नियंत्रण मंडळाला कळवले आहे. – योगेश गोडसे, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवा तपासणी केंद्रांच्या बाबतीत संबंधित पालिकांकडून कळाले आहे. उल्हासनगर महापालिकेशी याबाबत बोलणे झाले आहे. त्यांनीच या जागांबाबत ना हरकत दाखला दिला होता. त्यांनी पर्याय जागा दिल्यास प्रक्रियेअंती जागा बदलली जाऊ शकते. – बी. जी. कुकडे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, कल्याण.