उल्हासनगरः उल्हासनगर कॅम्प पाच भागातील प्रभात उद्यान येथे सुरू असलेल्या कामाची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या समितीने प्रभारी शहर अभियंता तरूण सेवकानी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे ठपके ठेवले आहेत. त्यामुळे सेवकानी यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. उद्यानाच्या विकासात अनियमितता झाली असून महापालिकेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. कामातील हा हलगर्जीपणा गंभीर स्वरूपाचा आसल्याचा ठपका तपासणी समितीने सेवकानी यांच्यावर ठेवला आहे.

उल्हासनगर महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता तरुण सेवकानी यांनी मागील ०३ वर्षात पूर्ण झालेल्या कामांचे देयके सादर केलेली नाहीत. त्याचवेळी अद्याप सुरु न झालेली कामे रद्द करणे आवश्यक असतानाही ती रद्द केली नाहीत. या कारणास्तव त्यांना पालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सेवकानी यांनी यावर खुलासा सादर केला होता. मात्र त्यांचा खुलासा अमान्य करण्यात आला होता. आयुक्तपदाची सुत्रे घेतल्यानंतर उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी शहरातील विविध महत्वाच्या कामांचा आढा घेतला होता. यावेळी त्यांनी उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागातील प्रभात उद्यानाचीही पाहणी केली होती. येथे कामात अनियमितता आढळल्याने त्या कामाची तपासणी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. यात प्रभारी शहर अभियंता तरूण सेवकांनी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या समितीचा अहवाल २८ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला. या अहवालामध्ये अत्यंत गंभीर बाबी निदर्शनास आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. या बाबी अत्यंत गंभीर स्वरुपाची आहेत. तसेच या विकासकामामध्ये अनियमितता झाल्याची बाब प्रथमदर्शनी समितीला दिसून आली. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसानही झालेचे निष्पन्न होत असल्याचे पालिकेने काढलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे. तसेच सेवकानी यांच्या कार्यालयीन कामकाजामध्ये हलगर्जीपणा केल्याचे दिसुन आले असून ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे असे पालिकेचे म्हणने आहे. सेवकानी यांना सोपवण्यात आलेले कामकाज जबाबदारीने पार पाडण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे विभागीय चौकशीच्या अधिन राहून सेवकानी यांना महापालिका सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश उल्हासनगर महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

शहरातील महत्वाच्या विकासकामांकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने उल्हासनगर शहरातील नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. निधी असूनही कामांना सुरूवात न करणे आणि त्यावर योग्य कारवाई न करणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.