मतदान वाढवण्यासाठी हॉटेलमालकांचा पुढाकार

उल्हासनगर महापालिका निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी यंदा शहरातील हॉटेलमालक तसेच व्यवस्थापनांनी निवडणूक प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आगळीवेगळी योजना जाहीर केली आहे. मतदान करून हॉटेलांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना बिलामागे २० टक्क्य़ांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा येथील हॉटेलमालकांच्या संघटनेने केली. महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेत संयुक्त पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती पत्रकारांना देण्यात आली.

उल्हासनगर शहरात कमी क्षेत्रफळात मोठी लोकसंख्या राहत असली तरी येथील मतदानाची टक्केवारी कायम कमी राहिलेली आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये येथील मतदानाचा टक्का कधीही ५० टक्क्य़ांच्या पुढे जात नाही, असा अनुभव आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत जेमतेम ४२ टक्के मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत संपूर्ण देशभरात मोठय़ा संख्येने मतदान झाले होते. तेव्हाही उल्हासनगरात मतदानाची टक्केवारी ५० टक्क्य़ांच्या पलीकडे पोहोचली नव्हती. व्यापारी शहर असले तरी सिंधी      समाज कमी संख्येने मतदानाला उतरतो असा अनुभव आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना शहरातील हॉटेलमालकांनी आणि त्यांच्या संघटनेने बळकटी मिळावी यासाठी पुढाकार घेतला आहे.

पालिका प्रशासन आणि हॉटेलमालक संघटनेने आखलेल्या नव्या प्रस्तावानुसार येत्या महापालिका निवडणुकीचे मतदान करून येणाऱ्या ग्राहकांना बिलाच्या रकमेत २० टक्के सवलत देण्यात येण्याचे ठरले आहे. याचप्रमाणे उल्हासनगर शहरातील सर्वच हॉटेलमध्ये येत्या २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी बिलावर २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी मतदान केल्याचे हाताचे बोट दाखवणे गरजेचे आहे. उल्हासनगर शहरातील हॉटेलमालकांच्या संघटनेचे प्रकाश शेट्टी आणि राजू सोमानी यांनी नुकतीच आयुक्त निंबाळकर यांनी भेट घेत हा प्रस्ताव ठेवला. आयुक्तांनीही तात्काळ त्याला मंजुरी दिली.

विद्यार्थ्यांचे भावनिक पत्र

महापालिका शहरातील सर्वच शाळांतील विद्यार्थी पालकांना मतदान करावे यासाठी एक भावनिक पत्र देणार आहेत. या पत्रात ‘एक दिवस माझ्या भविष्यासाठी’ अशा आशयाचे आवाहन केले जाणार आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. उल्हासनगर शहरात पालिकेच्या ३२ हजार, तर इतर पन्नासहून अधिक शाळांमध्ये जवळपास ७० हजार विद्यार्थी आहेत. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्यामार्फत मतदान वाढावे यासाठी प्रयत्न केले जातील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

प्रभातफेरीचे आयोजन

मतदान जागृतीसाठी येत्या शुक्रवारी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील चार भागांत एकाच वेळी ही फेरी निघणार असून यात धर्मगुरू, प्रतिष्ठित व्यक्ती, विद्यार्थी, पालिका कर्मचारी आदी सहभागी होणार असून उमेदवारांनीही पक्षाचे चिन्ह टाळून या प्रभागफेरीत सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त राजेंद्र निंबाळकरांनी केले आहे.