उल्हासनगर : उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात विनयभंगाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या एका आरोपीने पिडीत मुलींच्याच घरासमोर ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढली होती. याप्रकरणी संपात व्यक्त होत असतानाच विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालकांना याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोबतच आरोपींचा जामीन रद्द करण्याची मागणीही केली आहे. आरोपीने जामिनाच्या अटींचे उघड उल्लंघन केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाली असून, हा कायद्यावरील विश्वास डळमळीत करणारा प्रकार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे. या प्रकारानंतर शहरात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
उल्हासनगर शहरात कायदा सुव्यवस्थेची धिंडवडे काढण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात तुरूंगात असलेल्या आरोपी राहित झा याला जामीन मिळाला. त्यानंतर त्याच्या स्वागतासाठी तुरूंगाबाहेर समर्थक जमले. त्यानंतर त्यांनी तेथून मिरवणूक काढून उल्हासनगर शहरात प्रवेश केला होता. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या समर्थकांनी ज्या परिसरात गुन्हा घडला त्याच परिसरात मिरवणूक काढली. ढोल ताशे वाजवत, फटाके फोडत मिठाई भरवत यावेळी मिरवणूक काढली गेली. समाज माध्यमांवर हा प्रकार प्रसारीत झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी संबधित आरोपीवर आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकारामुळे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. आरोपींना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. याप्रकरणी संताप व्यक्त झाल्यानंतर पोलिसांवर टीकेच झोड उठवण्यात आली.
याप्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही पोलिसांशी संवाद साधला. उल्हासनगर येथे तीन दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्यानंतर त्यातील आरोपी रोहित झा याला जामीन मिळाला आणि तो जामिनावर सुटल्यावर वाजतगाजत मिरवणूक काढून पीडित मुलींना धमकावण्याचा प्रयत्न करतो, ही अतिशय निंदास्पद व हीन प्रवृत्ती आहे. गुन्हा करून सुटल्यानंतर पीडितांना मानसिक त्रास देणे हे अजिबात सहन केले जाणार नाही. यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी निलम गोऱ्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. पीडित मुलींना पुन्हा धमकावले जाणार नाही, यासाठी पोलिसांनी काही संरक्षणात्मक उपाययोजना देखील हाती घेतल्या आहेत. तसेच, पीडित मुलींना समुपदेशन देऊन त्यांचा धीर वाढवणे आवश्यक आहे, असेही गोऱ्हे यांनी सांगितले. या घटनेच्या आधारे न्यायालयात सविस्तर अहवाल सादर करून आरोपी रोहित झा याचा जामीन रद्द करण्यासाठी तातडीने प्रस्ताव दाखल करावा. तसेच, जामिनाच्या अटींचे उल्लंघन व न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणल्याबद्दल नवीन गुन्हा दाखल करून आरोपीला त्वरित ताब्यात घ्यावे, असेही निर्देश त्यांनी दिले. पीडित कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे. परिसरात अशा प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त स्तरावर सतत आढावा घेतला जावा, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.