उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण विभागात गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने ११४ शिक्षक, ८ कर्मचारी यांचे वेतन आणि ४२३ निवृत्त कर्मचऱ्यांचे निवृत्तीवेतन रखडले होते. याबाबत सर्वप्रथम लोकसत्तामध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याच प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी अनोखे आंदोलन केले. त्यांनी महापालिकेतील रिकाम्या खुर्चीला शाल आणि हार घालून तिचे ‘स्वागत’ केले होते.
त्यानंतर उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी तातडीने लेखा विभागातील दीपक धनगर यांची प्रभारी शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर शिक्षक, कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतनाचे धनादेश बँकेत जमा करण्यात आले.
उल्हासनगर महापालिकेत काही महिन्यांपूर्वी बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा आणि नव्याने पालिकेत नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यभार वाटपाचा विषय चर्चेत होता. त्यात महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांचे जून महिन्याचे वेतन रखडल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे शिक्षकांना दैनंदिन खर्चासह कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. याबाबत लोकसत्ताने वृत्त प्रकाशित केले होते. पालिका प्रशासनातील ढिसाळ कारभाराचा शिक्षकांना फटका बसला.
शिक्षण अधिकारी पद रिक्त असल्याने त्या पदाचा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. त्यात लेखाधिकारी बदलीचा प्रश्नही काही दिवस लटकल्याने शिक्षकांच्या वेतनाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली नव्हती. हा गोंधळ तातडीने संपवावा अशी मागणी शिक्षकांकडून केली जात होती. त्यामुळे जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला तरी जून महिन्याचे वेतन होऊ शकले नव्हते. परिणामी शिक्षक आर्थिक संकटात सापडले होते.
याबाबत लोकसत्तामध्ये वृत्त प्रकाशित केल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रभारी अधिकारी नेमण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. याच दरम्यान मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्त खुर्चीला हार घालत अनोखे आंदोलन केले. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर तातडीने हालचाली झाल्या. अखेर रिक्त शिक्षणाधिकारी पदावर लेखा विभागातील दीपक धनगर यांची प्रभारी शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर महापालिकेच्या शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन मार्गी लागले आहे. त्यामुळे शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र या पदावर कायमस्वरूपी अधिकारी नेमावा ही मागणी शिक्षकांनी केली आहे. त्यामुळे या पदाला कायमस्वरूपी अधिकारी कधी मिळतो हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.