उल्हासनगर : वाहतूक कोंडी, अवजड वाहनांचा त्रास आणि अनधिकृत वाहन थांब्यांचा गोंधळ यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने सर्वसमावेशक ‘कृती आराखडा’ जाहीर केला आहे. आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त आणण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्याची अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावीपणे झाल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल.

उल्हासनगर शहरात विविध अडथळ्यांमुळे वाहतूक कोंडी समस्या गंभीर बनली आहे. रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने, अवजड वाहनांची गर्दी, सिग्नलवर असलेले खड्डे, झेब्रा पट्ट्यांचा अभाव अशा अनेक समस्यांमुळे वाहतूक कोंडी फुटताना दिसत नाही. परिणामी यावर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाने यापूर्वी एक बैठक घेत नियोजन सुरू केले होते. त्यानंतर आता पुन्हा पालिकेने शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी कृती आराखडा सादर केला आहे. यासाठी विशेष बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत ‘स्मार्ट पार्किंग’ संकल्पना राबविणे, शहरातील अनधिकृत रिक्षा थांबे तातडीने हटविणे, रस्त्यांवर होणारी वाहन विक्री थांबवून त्यावर कठोर कारवाई करणे, तसेच रस्त्यांवरील खुणा, सम विषम पार्किंग आणि “नो पार्किंग” असे सूचक फलक लावण्यासाठी योग्य ठिकाणे निश्चित करून पुढील पंधरा दिवसांत त्याची माहिती महापालिकेला देणे, असे निर्देश वाहतूक शाखेला देण्यात आले. त्याचबरोबर अवजड वाहनांची वाहतूक नियमन करून गर्दीच्या भागांत त्यांचा प्रवेश नियंत्रित करणे, विकासकामे सुरू असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे आणि नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणे, तसेच गर्दीच्या वेळेत वाहतूक व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याची जबाबदारीही विभागांना सोपविण्यात आली.

आयुक्त आव्हाळे यांनी स्पष्ट केले की, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत कार्यवाही पूर्ण करून लेखी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. अनुपालन अहवाल पुढील बैठकीत सादर केला जाईल आणि ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. “नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाईल. ‘स्मार्ट पार्किंग’सह सर्व उपाययोजना राबवून नागरिकांना सुरक्षित, सुरळीत आणि वेगवान वाहतूक सुविधा देणे हे आमचे प्राधान्य आहे,” असेही त्या म्हणाल्या.

या निर्णयांमुळे येत्या काही महिन्यांत उल्हासनगरची वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सोयीस्कर होईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम केल्यास शहर आदर्श वाहतूक व्यवस्थेचे उदाहरण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.