उल्हासनगरः नळ तुटला, रस्त्यावर खड्डा पडला, कचऱ्याचा ढीग साचला किंवा अन्य नागरी समस्या उद्भवल्या तरी आता नागरिकांना महापालिकेची दारं ठोठवावी लागणार नाहीत.

उल्हासनगर महानगरपालिकेने आधुनिक ‘ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली’ कार्यान्वित करून नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता तक्रारी करणे सोपे होणार आहे. ही प्रणाली शहरातील दैनंदिन अडचणींचे वेगवान आणि पारदर्शक निवारण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारी थेट संबंधित विभागाकडे पोहोचतील आणि ठराविक कालमर्यादेत त्यावर कार्यवाही होईल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.

कोणत्याही पालिकेत तक्रार करणे म्हणजे पूर्ण मोठे संघर्षाचे होते. मात्र नागरी समस्या सोडवण्याच्या दृष्टीने विविध माध्यमातून पालिका आता निर्णय घेत असताना दिसत आहे. उल्हासनगर महापालिकेनेही याच दृष्टीने नागरिकांसाठी नवी तक्रार प्रणाली उभारली आहे. तीची नुकतीच सुरूवात झाली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचणार असून प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ होणार आहे. ही सुविधा नागरिकांना सोयीस्कर ठरण्यासोबतच प्रशासनाला पूरक असेल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी या प्रणालीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

प्रत्येक नागरिकाची तक्रार आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन देणे हे महापालिकेचे ध्येय आहे. आता घरबसल्या तक्रार नोंदवून तिचे निवारण ठराविक वेळेत होईल, ही प्रणाली नागरिकांचा विश्वास वाढवणारी ठरेल, अशी प्रतिक्रिया उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिली आहे.

यापूर्वीही पालिकेने आपल्या विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरूवात केली आहे. राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या मोहिमेत विविध निर्णय उल्हासनगर महापालिकेने घेतले. पालिकेचा कारभार नागरिकांच्या सोयीसाठी व्हावा या संकल्पनेवर आधारित अनेक सुविधा घरबसल्या आता घेता येतात. त्यामुळे आता या सुविधांसह तक्रारीही घरबसल्या करता येणार असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.

अशी नोंदवा तक्रार

  • उल्हासनगर महापालिकेच्या ‘तक्रार निवारण पोर्टल’ https://grievances.smartumc.info वर लॉगिन करावे.
  • तक्रार नोंदवल्यानंतर ती तात्काळ संबंधित विभागाकडे पाठवली जाईल.
  • निवारणाची प्रक्रिया पारदर्शक राहील आणि ठराविक कालमर्यादेत पूर्ण केली जाईल.
  • तक्रार नोंदणी व निवारण प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी https://umc.gov.in या संकेतस्थळावर माहितीपट उपलब्ध आहे.

प्रणालीचे मुख्य फायदे

  • घरबसल्या तक्रार नोंदवण्याची सोय
  • केंद्रीकृत आणि पारदर्शक व्यवस्थापन
  • ठराविक वेळेत तक्रारींचे निवारण
  • वेळ, श्रम आणि खर्चात बचत