उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिकेने राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने राबविलेल्या विशेष मालमत्ता कर भरणा योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शनिवार, १३ सप्टेंबर रोजी झालेल्या या उपक्रमात थकबाकीदारांना चालू मागणीसह एकरकमी संपूर्ण थकबाकी भरल्यास १०० टक्के विलंब शुल्क माफी देण्याची सुविधा देण्यात आली होती. या संधीचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत एकाच दिवसात विक्रमी ५ कोटी १९ लाख ५१ हजार ३२१ रूपयांची भर पडली आहे.
उल्हासनगर महापालिकेला गेल्या काही वर्षात मालमत्ता कर वसुलीत सातत्याने अपयश आले आहे. त्यामुळे अनेकदा अभय योजना लागू करण्याची वेळ पालिकेवर येते. यंदाच्या वर्षात पालिकेने एकदा अभय योजना लागू केली. फेब्रुवारी महिन्यात लागू केलेल्या अभय योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पालिका प्रशासन मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी मालमत्ता धारकांना संधी देत असले तरी नागरिकांकडून भरणा केला जात नसल्याची बाब समोर आली. त्यातही सर्वसामान्य नागरिक त्यांचा कर नियमितपणे भरत असला तरी मोठे थकबाकीधारक यांच्यामुळे मालमत्ता कराचा आकडा कोटींच्या घरात असल्याचेही समोर आले होते.
राष्ट्रीय लोक अदालतीच्या निमित्ताने १३ सप्टेंबर रोजी पालिकेत एक दिवसीय मालमत्ता कर भरणा योजना राबवण्यात आली होती. या योजनेत नागरिकांनी चालू मागणीसह एकरकमी संपूर्ण थकबाकी भरल्यास १०० टक्के विलंब शुलस्क माफी देण्याची सुविधा देण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांना थकबाकीसह चालू कराचा भरणा करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे एकाच दिवशी विक्रमी ५ कोटी १९ लाख ५१ हजार ३२१ रूपये इतकी करवसुली झाली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. यात रोख स्वरूपात ४ कोटी २९ लाख ४८ हजार ६७९ रूपये इतका तर धनादेश स्वरूपात ९० लाख ०२ हजार ६४२ रूपये इतका भरणा करण्यात आला आहे.
गेल्या वर्षापेक्षा जास्त वसुली
मागील वर्षी झालेल्या अशाच उपक्रमात एकूण ३.५० कोटींची वसुली करण्यात आली होती. त्यामध्ये पाणीपट्टी कराचाही समावेश होता. यंदा मात्र केवळ मालमत्ता कर वसुलीतच तब्बल ५ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली असून, हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
थकबाकी वाढतीच
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात एकूण १,८३,५५० मालमत्ता असून त्यामध्ये १,३६,५४३ रहिवासी मालमत्ता व ४७,००७ वाणिज्य मालमत्ता आहेत. यापैकी जानेवारी महिन्यात पालिकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार १ लाख २९ हजार ९२४ मालमत्ताधारक थकबाकीदार होते. त्यांच्याकडे असलेली एकूण थकबाकी सुमारे ९५१ कोटी रुपये इतकी होती. यातून निव्वळ थकबाकी ८३३ कोटी ३० लाख इतकी असून, ११७ कोटी ८० लाख ही चालू मागणी होती. तर महापालिकेने २४ फेब्रुवारीपासून “अखेरची अभय योजना” जाहीर केली होती. जवळपास महिनाभर चाललेल्या या योजनेत २५,५१० मालमत्ताधारकांनी सहभाग नोंदवला होता. या माध्यमातून ५१ कोटी रुपयांची वसूली झाली होती. नियमित वसुलीसह २२ मार्चपर्यंत एकूण १२६ कोटी १० लाख रुपये वसूल करण्यात आले होते. त्यामुळे अभय योजनेत फक्त १९ टक्के थकबाकीदारांनी सहभाग घेतल्याचे समोर आले होते. तर एकूण थकबाकीपैकी अवघे ५ टक्के रक्कमच वसूल झाली होती.