उल्हासनगर: शहरातील खड्डे बुजवण्याचे काम गणपतीपूर्वी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मनपा प्रशासनाकडून मिळाल्यानंतर आमदार कुमार आयलानी यांनी जाहीर केलेले आंदोलन मागे घेतले आहे. शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून सत्ताधारी भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी पालिका आयुक्तांना सात दिवसात खड्डे भरण्याचे आवाहन केले होते. तसे न झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. सत्ताधारी आमदाराना आंदोलनाचा इशारा द्यावा लागतोच कसा, अशा चर्चा शहरात रंगल्या होत्या. अखेर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमदार कुमार आयलानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेऊन खड्डे भरण्याचे आश्वासन दिले आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे मुंबईत निवडणुकीच्या बैठकीसाठी गेल्याने त्यांच्या वतीने उपायुक्त विशाखा मोटघरे, शहर अभियंता शिरसाट आणि अभियंता संदीप जाधव यांनी बैठकीत प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली. या बैठकीला आमदार कुमार आयलानी, शिवसेना आमदार बालाजी किणीकर, जिलाध्यक्ष राजेश वधर्या, आरपीआय जिलाध्यक्ष नाना बागुल यांच्यासह मित्र पक्षांचे नेते, माजी नगरसेवक व विविध पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत खड्ड्यांचे काम गणपतीपूर्वी पूर्ण करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला. एका ठेकेदारावर अवलंबून न राहता चार-पाच ठेकेदारांकडून काम करून घेण्याचा व कामाची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणतीही बेजबाबदारपणा झाल्यास कठोर कारवाई होईल, असा इशारा दोन्ही आमदारांनी दिला.
उपायुक्त मोटघरे यांनी खात्री दिली की गणपतीपूर्वी रस्ते नक्कीच दुरुस्त केले जातील. यानंतर उपस्थितांनी स्पष्ट केले की आंदोलन केवळ काम पूर्ण होईपर्यंत स्थगित केले आहे. जर दिलेल्या मुदतीत काम झाले नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल.
मनपाने लेखी पत्र देऊन खड्ड्यांचे काम गणपतीपूर्वी पूर्ण होईल, असा विश्वास दिल्यानंतर आमदार आयलानी यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. या बैठकीत समाज मंदिर उघडण्याबाबतही चर्चा झाली. बैठकीला कलवंत सिंग सहोटा, जमनू पुरस्वानी, महेश सुखरमानी, डॉ. प्रकाश नाथानी, टोनी शिरवानी, प्रकाश माखिजा आदींसह भाजप, शिवसेना व आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.