उल्हासनगरः उल्हासनगर शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या साजिद शेख हत्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. या गुन्ह्याच्या तपासाला आता वेग मिळाला असून, उल्हासनगर पोलिसांनी या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विशाल बेरभैया आणि दिनेश जाधव अशी आहेत. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी दोन आरोपींना अटक झाली असून, आतापर्यंत एकूण चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हत्येनंतर आरोपी पळून गेले होते आणि वेगवेगळ्या दिशांना हालचाली करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. गुन्ह्यानंतरचा त्यांचा प्रत्येक हालचालीचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, तांत्रिक साधनांचा वापर केला आणि सतत नजर ठेवून आरोपींची ओळख पटवली. ही धाडसी कारवाई पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने केली.

हत्या झाल्यानंतर साजिद शेख यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला होता की, केवळ दोन आरोपींवरच कारवाई करून पोलिस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, ठोस पुराव्यांवर आधारित तपास सुरू ठेवला. यामुळे स्थानिकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत विश्वास वाढला आहे. सध्या पाच आरोपी अजूनही फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल आणि संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. साजिद शेख हत्या प्रकरणातील तपास अंतिम टप्प्यात असल्याचीही माहिती मिळाली आहे.

निर्घृण हत्या

उल्हानगरात साजिद शेख याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून ही हत्या झाली होती. हत्येपूर्वी आरोपी आणि मृत साजिद एकमेकांना भेटले होते. जुने वाद मिटवण्यासाठी ही भेट होती. मात्र त्यात वाद मिटले नाहीत. त्यानंतर साजिदच्या मित्राला आरोपींनी मध्यरात्री अडवून साजिदला बोलवण्याचे सांगितले होते. त्यानंतर साजिद आला असता त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. यात साजिदचा मृत्यू झाला होता. या हत्येनंतर शहरात एकच खळबळ माजली होती.