उल्हासनगरः रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येसह पार्किंग, बेशिस्त रिक्षाचालक, रस्त्यात पडून असलेल्या गाड्या अशा कोणत्याही प्रकरच्या वाहतूकीच्या अडचणींवर मात करण्यासाठी आता उल्हासनगर वाहतूक विभागाने वाहतूक हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. यापुढे 91 8655654186 या क्रमांकावर संपर्क केल्यास वाहतूक पोलीस आपल्या वाहतूक समस्यांचे निरसण करतील. नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेश शिरसाट यांनी केले आहे.

व्यापारी शहर असलेल्या उल्हासनगर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडी वाढते आहे. मालाची ने आण करणारे आणि रस्त्यातच थांबणारे मालाचे ट्रक, टेम्पो, बेकायदेशीर पार्किंग, रस्त्यांवरील रिक्षाचालकांची मनमानी आणि ट्रॅफिक सिग्नलचे उल्लंघनामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्या डोळ्यासमोर ठेऊन, आता उल्हासनगर वाहतूक विभागाचे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी वाहनचालकांसाठी तात्काळ प्रतिसाद देणारी हेल्पलाइन सेवा सुरु केली आहे.

यात ९१ ८६५५६५४१८६ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. नागरिक या क्रमांकावर थेट संपर्क किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्या समस्या, सूचना किंवा तक्रारी नोंदवू शकतात. त्यामुळे कोणत्याही वाहतूक अडचणीची नोंद कुठूनही करता येणार आहे. या सेवेमुळे रस्त्यांवरील अडथळे, बेशिस्त वाहनचालक, रिक्षाचालकांची मुजोरी अशा बाबी वाहतूक पोलिसांना लवकर कळणार आहे. त्यामुळे अशा बाबींवर तातडीने कारवाई करता येणे शक्य होणार आहे.

तक्रारी नाही तर सूचनाही

हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असला तरी ही सेवा केवळ तक्रारीपुरती मर्यादित नाही, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. यात नागरिकांना सूचना, वाहतूक सुरक्षेवरील मुद्दे, अपघात किंवा ट्रॅफिक सिग्नलचे बिघाड असे कोणतेही मुद्देही कळवता येणार आहे. या माध्यमातून प्रशासन व नागरिक यांच्यात थेट संवाद साधला जाणार आहे, जो शहरातील वाहतूक नियमनासाठी निर्णायक ठरेल. वाहतूक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या हेल्पलाइनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारी व सूचनांची लेखी नोंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवून आवश्यक ती तात्काळ किंवा नियोजित कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी तक्रार करताना शक्य असल्यास फोटो किंवा चित्रफीत पाठवावी, जेणेकरून अधिक स्पष्टता मिळेल आणि कारवाई सुलभ होईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शहरातील वाहतुकीचा दर्जा उंचावण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. या माध्यमातून सामान्य नागरिक थेट आमच्याशी संपर्क साधू शकणार असून त्यांच्या समस्या, तक्रारीवर त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे. – राजेश शिरसाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, उल्हासनगर.