उल्हासनगर : अनेक महिन्यांपासून अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा त्रास भोगावा लागल्याने उल्हानगरातील नागरिकांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला. उल्हासनगर महापालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात श्रीरामनगर परिसरातील महिलांनी बुधवारी थेट नेताजी चौक येथील पाणीपुरवठा कार्यालयातच धडक दिली. चार दिवस पाण्यावाचून हाल झाल्याने नागरिकांच्या संतापाला पारावार उरला नव्हता. “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही,” असा इशारा देत महिलांनी पाणी पुरवठा कार्यालयाच्या आवारातच ठिय्या दिला. महिलांच्या आक्रमकतेमुळे प्रशासनाला जाग आली आणि तातडीने पाणीपुरवठा सुरळीत केला गेला. मात्र तरी देखील कमी दाबामुळे बऱ्याच परिसरात पाणी आले नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्याबद्दलची नागरिकांमध्ये नाराजी कायम दिसून आली.

उल्हासनगर महापालिकेच्या निव्वळ नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना कायमच पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. सोमवारी सायंकाळी अंबरनाथ पालेगाव येथील मुख्य पाण्याच्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कॅम्प नंबर ४ आणि ५ मधील पाणीपुरवठा अचानक बंद झाला. प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने नागरिक गोंधळून गेले. मंगळवारी दुपारपर्यंत दुरुस्तीच्या कामानंतर पाणीपुरवठा सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी देखील पाणी न आल्याने महिलांनी आणि नागरिकांनी थेट पाणी पुरवठा कार्यालयात जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – ठाणे : ९९ कोटी रुपयांचा आरटीई शुल्क परतावा थकीत !

बुधवारी सकाळी येथील श्रीरामनगर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने पाणीपुरवठा कार्यालय गाठण्यास सुरुवात केली. “आम्हाला चार दिवसांपासून पाणी नाही, लहान मुलं, वयोवृद्ध त्रस्त आहेत. यासाठी तुम्ही जबाबदार आहात,” असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत इथून हलणार नाही,” असे ठणकावत त्यांनी पाणीपुरवठा कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. महिलांचा निर्धार आणि आवाज पाहून पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी देखील बिथरले.

संतप्त महिलांच्या दबावामुळे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अश्विन राठोड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला. काही तांत्रिक अडचणी दूर करत अखेर श्रीरामनगर परिसरात पाणीपुरवठा सुरू केला गेला. मात्र तरी देखील प्रेशर कमी असल्याने बऱ्याच भागात पाणी आले नसल्याने महिलांमध्ये नाराजी दिसून आली. महिलांच्या आंदोलनामुळे महापालिकेला जाग आली खरी, मात्र त्यासाठी नागरिकांना चार दिवस पाण्याविना हाल सहन करावे लागले.

या आंदोलनाने महिलांनी एकीचे बळ दाखवून दिले आहे. मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ नागरिकांवर येत असल्याचे यावेळी दिसून आले. स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र यावेळी नामानिराळेच राहिल्याचे दिसून आले. दरम्यान, महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर प्रश्नचिन्ह मात्र कायम आहे. पाणी पुरवठ्याची स्थिती अशीच कायम राहिल्यास नागरिकांच्या संतापाचा भडका पुन्हा उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा – जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही बऱ्याच महिन्यांपासून पाण्यासाठी त्रस्त आहोत. लहान मुलं, वृद्ध लोकांना खूपच त्रास झाला. पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा बंद करणे, हे महापालिकेचे मोठे अपयश आहे. आम्ही खूप वेळ गप्प बसलो, पण आता सहनशक्तीचा अंत झाला. म्हणूनच आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पुढील आठ दिवसात पाणी समस्या सुटली नाही तर आम्ही महिला महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार आहोत. – भाविका म्हात्रे ( गृहिणी )