बदलापुरात कारवाईला आठवडा उलटताच पुन्हा अतिक्रमण
कुळगाव बदलापूर नगरपालिकेने रेल्वे स्थानकालगत असलेला स्कायवॉक अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. त्यानंतर काही दिवस पादचाऱ्यांसाठी स्कायवॉक मोकळा झाला होता. या कारवाईला आठवडा उलटत नाही तोच पुन्हा एकदा स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू झाल्याने नगरपालिकेच्या कारवाईला कुणीही जुमानत नसल्याचे चित्र आहे.
रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांना हक्काचा मार्ग म्हणून स्कायवॉकची निर्मिती करण्यात आली आहे. अगदी सुरुवातीपासूनच त्यावर फेरीवाल्यांनी बस्तान बसविल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. या स्कायवॉकचा चालण्यासाठी कमी, खरेदीसाठी अधिक वापर होऊ लागला आहे. बदलापूर रेल्वेकडून स्कॉयवॉकची निर्मिती करण्यात आली आहे. काही कालावधी लोटल्यानंतर या स्कायवॉकचे हस्तांतरण कुळगाव बदलापूर नगरपालिकेकडे करण्यात आले. ठाणे, डोंबिवली आणि कल्याणप्रमाणे बदलापुरातील स्कायवॉकवर फेरिवाल्यांनी बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना चालताना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली होती. गेल्याच आठवडय़ात बदलापूर पालिकेतर्फे जुजबी कारवाईही करण्यात आली. मात्र त्या कारवाईला आठवडा उलटत नाही तोच फेरीवाले आणि विक्रेत्यांनी पुन्हा या ठिकाणी बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. कारवाई झाल्यानंतर अनधिकृत विRे ते आणि फेरीवाल्यांची संख्या कमी होईल अशी आशा होती. उलट फेरीवाल्यांची संख्या पाचवरून थेट दहापर्यंत पोहोचली. त्यामुळे पालिका प्रशासनाचा या फेरीवाल्यांना कोणताच धाक नसल्याचे सिद्ध होत आहे.
काँक्रिटीकरणामुळे रस्ताही बंद
बदलापूर पूर्वेस रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक रस्ता बंद आहे. उर्वरित ठिकाणी रिक्षाचालकांची मुजोरी आणि रस्त्यावर बसणाऱ्या फळविक्रेत्यांमुळे पादचाऱ्यांना गर्दीतून वाट काढणे कठीण होऊन बसले आहे. स्कायवॉकचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र त्यावरही आता फेरीवाल्यांनी बस्तान बसवल्याने संतापाचे वातावरण आहे.