शहरात रस्त्यांची अवस्था बिकट, महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम
भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील अनेक भागात पालिकेच्या परवानगीशिवाय सर्रासपणे खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. तसेच रस्ते खोदकाम करण्याकरिता आकारण्यात येणारा महसूल बुडत असल्याने पालिकेला आर्थिक नुकसान होत आहे.
मीरा-भाईंदर शहर हे ७९.४० चौ.कि.मी. परीसरात वसलेले शहर आहे. शहराच्या विकासाकरिता पालिका प्रशासनाकडून विविध पद्धतीच्या उपायोजना आखून अर्थसंकल्प तयार करण्यात येतो. यातील मोठा भाग हा केवळ रस्तेनिर्मिती व दुरुस्तीकरीता खर्च करण्यात येतो. ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाला सोपवण्यात आली आहे. नियमानुसार खाजगी कामाकरिता रस्त्याचे खोदकाम केल्यास त्यावर प्रशासन एक मीटरकरिता ९ हजार रुपयांची आकारणी करते. या आकारलेल्या रकमेतून पुन्हा त्या रस्त्याची दुरुस्ती करून मार्ग सुरळीत करण्यात येतो. मात्र शहरात वाढत असलेल्या विद्युत कंपन्या आणि अंतरजाल सुविधेकरिता सर्रासपणे विनापरवानगी खोदकामात वाढ झाली आहे. अनेक भागात कित्येक वर्षांपासून हे खोदलेले खड्डे त्याच स्वरूपात असल्यामुळे नागरिक संतप्त आहेत. अधिकाऱ्यांची या खाजगी कंपन्यांबरोबर साठगाठ असल्यामुळे हे खोदकाम सुरू असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहेत.
कामाच्या खोदकामासाठी दर आकारण्यात येतो. त्याद्वारे सुमारे प्रति वर्षी ४० कोटीहून अधिक उत्त्पन्न जमा होते. याच पैशाद्वारे शहरातील रस्ते बुजविणे (पॅचवर्क) तसेच डांबरीकरणाचे काम करण्यात येते. मात्र विनापरवानगी खोदकाम केले जात असल्याने पालिकेचे उत्पन्न बुडत आहे.
शहरात खोदकाम करण्यापूर्वी पालिकेची परवानगी आवश्यक असते. विनापरवानगी खोदकाम करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते.
– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग
