मालकांना आर्थिक विवंचना; एका जागेवरच उभ्या घोडय़ांवर उपासमारीची वेळ

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्व काही बंद आहे. कोणत्याच मार्गाने हाती पैसा येत नसल्याचे घोडे मालकांना घोडय़ांसाठी चारा पाणी व इतर खाद्य देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. आर्थिक विवंचनेमुळे या घोडय़ांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे.

हातावर पोट असलेल्या घोडे व्यावसायिकांवर व त्यांच्या घोडय़ांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. घोडय़ांना खुराक हा मोठय़ा प्रमाणात लागतो तसेच त्याचा खर्च ही फार मोठा आहे. दरवर्षी लग्न सराई व विविध प्रकारच्या मिरवणुकीत या घोडय़ांचा वापर केला जात होता. यातून घोडे मालकांची चांगली कमाई होत असते यातूनच त्या घोडय़ांची देखभाल व त्यांना लागणार चारापाणी याची व्यवस्था होते. परंतु करोनामुळे सगळेच समारंभ रद्द झाल्याने या घोडे मालकांच्या हातची कमाई निघून गेली आहे.

टाळेबंदी लागू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. हातात जे काही पैसे होते त्यातून घोडय़ांना लागणाऱ्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु आता चारापाणी यासाठी लागणारा खर्च करण्यासाठी हातात पैसेच शिल्लक नसल्याने या घोडय़ांचा सांभाळ कसा करणार असा प्रश्न या मालकांनासमोर उभा राहिला आहे.  विरार बोलींज येथे राहणाऱ्या दिनेश गुप्ता या घोडे मालकांकडे सहा घोडे आहेत. साधारणपणे या घोडय़ांना खुराकासाठी महिन्याकाठी लागणारे ६० ते ७० हजार रुपये उभे करणेही जवळपास अशक्य झाले आहे.

शासनाने चारा उपलब्धतेसाठी मदत करावी

शहरात विविध ठिकाणच्या भागात घोडय़ांचा व्यवसाय करणारे आहेत. परंतु टाळेबंदीत या घोडेमालकांची व घोडय़ांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. टाळेबंदी कधी संपेल हे सांगता येत नाही. तसेच दिवाळीशिवाय हा व्यवसाय लवकर सुरू होणार नाही. त्यामुळे पुढील चार ते पाच महिने या घोडय़ांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी घोडे मालकांनी केली आहे.

विविध ठिकाणच्या मिरवणुका व समारंभात घोडे भाडय़ाने देण्यासाठी महागडे घोडे खरेदी केले आहेत. परंतु टाळेबंदीत सर्व काही ठप्प झाल्याने या घोडय़ांच्या देखभालीसाठी अडचण निर्माण होऊ  लागली आहेत. घोडय़ांच्या खुरकाची मदत मिळाली तर चांगले होईल.

दिनेश गुप्ता, घोडे मालक, वसई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाळेबंदीमुळे संकटात सापडलेल्या घोडेमालकांना सेवा भावी संस्था यांच्या मदतीने चारापाणी उपलब्ध करून दिला आहे. तसेच इतर जे कोणी घोडे मालकांना घोडे सांभाळण्यासाठी अडचणी येतात त्यांना ही गरजेनुसार मदत मिळवून दिली जाईल.

डॉ. नकुल कोरडे, पशु धन विकास अधिकारी, वसई