|| ऋषिकेश मुळे

ठाणे जिल्ह्यात अल्पशिक्षित उमेदवारांचा भरणा:- ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांचे नेतृत्व करण्यासाठी विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी प्रमुख पक्षांचे उमेदवार हे अल्पशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. ४ थी पास ते ११ वी नापास असलेल्या उमेदवारांचा भरणा आहे. तर उच्चशिक्षित उमेदवारही रिंगणात आहेत.

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत ३२७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जाच्या छाननीअंती २५१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. सोमवार, ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३८ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्यामुळे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये २१३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र रिंगणात उतरलेल्या २१३ उमेदवारांपैकी अनेक प्रमुख पक्षांचे मोठे नेते हे अल्पशिक्षित आहेत. तर यापैकी अनेक उमेदवार हे विद्यमान आमदारदेखील आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री असणारे आणि ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री असणारे कोपरी-पाचपाखाडीतील शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांचे शिक्षण ११ वी पर्यंत झालेले आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गणेश नाईक यांचे शिक्षण जुनी ११वीपर्यंत झाले आहे. तर बेलापूर मतदारसंघाच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे. भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार शांताराम मोरे यांचे शिक्षण इयत्ता ४ थीपर्यंतच आहे. दुसरीकडे अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर, काँग्रेसचे रोहित साळवे आणि मनसेचे सुमेध भवार हे तीनही उमेदवार उच्चशिक्षित आहेत.